मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने – मुख्यमंत्री

मुंबई : ७ सप्टेंबर – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध उपक्रमांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भाजपा आणि शिवसेनेचे नेते एका व्यासपीठावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपाला अप्रत्यक्षरित्या सुनावलं. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात भिवंडीतील बंद पडलेल्या आरोग्य केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीचा संदर्भ पकडत त्यांनी भाजपा नेत्यांना अप्रत्यक्ष कानपिचक्या दिल्या.
“आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. यासाठी जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. धार्मिक स्थळं उघडली पाहीजेत, हरकत नाही. कपिल पाटीलजी तुमच्याकडे आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे ना, कि त्याच्या बाजूला मी मंदिरं उघडू. आरोग्य केंद्र बंद करून. आज आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरं ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने जाणार आहोत. आपण घोषणा देताना भारत माता की जय, वंदे मातरम देतो, द्यायला चांगल्या आहेत. आम्हीही त्या घोषणा दिलेल्या आहेत. घोषणेच्या पुढे जात आम्ही हिंदुत्वाचं रक्षण केलेलं आहे. हे ९२-९३ साली दाखवून दिलेलं आहे.”, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितलं. “तुम्ही गाय वासरुचा उल्लेख केला. ही काँग्रेसची निशाणी होती. गाय वासरू नका विसरू. तुम्ही अजूनही ती विसरलेले नाहीत. तरी देखील तुम्ही युतीच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख केला. बसा एकत्र, काय पाहीजे कल्याण डोंबिवलीला. जे शक्य होईल ते देईल.”, अशा कानपिचक्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित भाजपा नेत्यांना दिल्या.
दुसरीकडे त्यांनी फेरीवाल्यांच्या मुद्द्याला हात घालत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. “मधल्या काळात जी काही घटना ठाण्यामध्ये घडली. त्यामुळे येत्या काळात आपल्याला कठोरपणे कायदा राबवावा लागेल. तिथे दया, माया, क्षमा दाखवता येणार नाही. नागरिक, माता भगिनी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आपल्यावर आहे. त्याबाबतीत कुठेही हयगय चालणार नाही. स्कायवॉकच नव्हे तर इतर ठिकाणी जर फेरीवाल्यांचा उच्छाद असेल. तो उच्छाद आपल्याला आटोक्यात आणावाच लागेल. त्या दिशेने काम हे आपल्याला करावं लागेल.”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Leave a Reply