नवी दिल्ली : ७ सप्टेंबर – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर टीका केली भारतीय जनता पार्टीने लोकशाहीचा खून केल्याचा आरोप केल्याबद्दल आठवले यांनी बॅनर्जी यांनी सुनावलं आहे. तृणमूलनेच पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची हत्या केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे असलेले अभिषेक यांनी कथित कोळसा तस्करी प्रकरणी ६ सप्टेंबर रोजी ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर भाजपावर टीका केली होती.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) नेते आठवले यांनी पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या कथित हल्ल्यांचा हवाला देत राज्य सरकारच्या लोकशाही तत्त्वांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पश्चिम बंगालमध्येच लोकशाहीची हत्या केली जात आहे. लोकशाहीद्वारेच ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जिंकली आणि असे असूनही, भाजप कार्यकर्त्यांवर अनेक हल्ले झाले, अनेक हत्या झाल्या, लोकशाही कोण मारत आहे? ”असा सवाल आठवले यांनी उपस्थित केला.
याआधी, सोमवारी, अभिषेक बॅनर्जी यांनी आरोप केला होता की, भाजप तृणमूलला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि “आम्ही अधिक जोमाने लढू,” असे ठामपणे सांगितले होते. बॅनर्जी यांनी सांगितले होते की, चालू असलेल्या तपासात त्यांच्याविरोधात काही आढळल्यास ते सार्वजनिकरित्या फाशी घेतील. टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “त्यांनी(भाजपाने) लोकशाहीला मारलेल्या प्रत्येक राज्यात आम्ही जाऊ.”
या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रामदास आठवले म्हणाले की, “ज्या राज्यांना त्यांना भेट द्यायची आहे, तिकडे त्यांनी खुशाल जावे, त्यांना कोणीही अडवत नाही. ते देशभर फिरले तरी नरेंद्र मोदींना सामोरं जाण्याची ताकद तृणमूलमध्ये नाही.
आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या लोकांचा चांगला पाठिंबा मिळाला आणि त्यानुसार त्यांनी राज्यातील गुंडगिरी थांबवण्यासाठी काम केले पाहिजे. “ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. आता, त्यांनी पश्चिम बंगालमधील गुंडगिरी संपवली पाहिजे,” असे आठवले म्हणाले.