डिसेंबर २०२३ पर्यंत गर्भगृहातून भगवान श्रीरामांचे दर्शन शक्य – मिलिंद परांडे

नागपूर : ७ सप्टेंबर – अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिराची सध्या पायाभरणी सुरू असूून डिसेंबर २०२३ पर्यंत गर्भगृहात भगवान श्रीरामाचे दर्शन करू शकू, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलींद परांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, मागील तीन-चार दिवसात अयोध्येत जाऊन आलो. श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनाबद्दल सर्वांच्याच मनात आस्था आहे. भगवंतांच्या जन्मभूमीवर आता मंदिराच्या निर्माणाची काय गतिविधी सुरू आहे, याबद्दलही उत्सुकता आहेच. श्रीरामजन्मभूमीवर प्रत्यक्ष मंदिराच्या निर्माणाची प्रक्रिया सुरू आहे. पाया रचण्याची तयारी सुरू आहे.
जन्मभूमीच्या परिसरामध्ये ४०० बाय ३०० बाय ६० फूट ऊंच एवढा भाग खोलवर खोदला गेला आहे. तेथे प्रत्यक्ष पायाभरणी सुरू आहे. साधारण ३०-४० दिवसात हे काम पूर्ण होईल. ग्रॅनाईट व सँडस्टोनने प्लिन्थने पायाभरणी होईल. त्यावर १६ फूट ग्रॅनाईटचा प्लिन्थ राहील. त्यानंतर मंदिर उभारणीस सुरुवात होईल. कामाची गती पाहता वेळेआधी ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. तळ अधिक एक मजला, यात बदल होऊन तळ अधिक दोन मजले उभारले जाणार आहेत. पूर्वी तीन शिखरांचे मंदिर, असा विषय होता. आता ५ शिखरांचे मंदिर करण्याचा निर्णय श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने घेतला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये भगवान श्रीराम प्रत्यक्ष गर्भगृहात विराजमान व्हावेत व त्यांचे दर्शन आपण करू शकू, असा विश्वास वाटतोय.
जवळजवळ ७० एकर जागेत श्रीरामजन्मभूमी आहे. मंदिर, सभोवतालचा परकोटा, उरलेल्या ७० एकर जागेत प्रत्यक्ष काहीना काही अन्य आवश्यक गोष्टी, पायाभूत बाबी मंदिराच्या दृष्टीने आवश्यक असतील त्याबद्दल विचार होईल. अयोध्या प्रथम क्रमांकचे तीर्थक्षेत्र होईल, यादृष्टीने तेथे विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.अनेक वर्षांपासून दगडांच्या घडवणुकीचे काम सुरू आहे, कोरीव काम सुरू आहे, असे मिलींद परांडे यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे उपस्थित होते.

Leave a Reply