एका आठवड्यात मुद्द्यावर चर्चा करा अन्यथा माफी मागा – नितेश राणेंचा जावेद अख्तर यांना अल्टिमेटम

मुंबई : ६ सप्टेंबर – प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. त्यावरून देशात मोठा वादंग निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याच नेत्यांनी अख्तर यांच्या वक्तव्याचा विरोध करत त्यांच्यावर टीका केली आहे. त्यानंतर आता याच मुद्यावर भाजप आमदार नितेश राणे देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी दोन पानी पत्र लिहून जावेद अख्तर यांना अल्टिमेटम दिला आहे.
जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तुलना करण्याला नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं की, संघाची तालिबानशी तुलना करणं नियोजित षडयंत्राचा भाग आहे. तालिबानी प्रवक्त्यासारखी भूमिका घेत हिंदुत्वाची तुलना तालिबान्यांशी करण्यात आली आहे. हिंदुत्वाबद्दल एवढा राग कशासाठी? असा सवालही राणे यांनी यावेळी विचारला आहे. त्याचबरोबर संबंधित मुद्यावर एक आठवड्याच्या आत चर्चा करा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही तयार आहोत. अन्यथा जाहीरपणे माफी मागा, असं आव्हान राणे यांनी केलं आहे.
महिलांच्या हक्कांबाबत तुम्हाला काय माहीत आहे? तिहेरी तलाकाच्या मुद्यावर तुम्ही कुठे होता, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. शिवाय एक आठवड्याच्या आत कोणतं व्यासपीठ किंवा स्टुडिओ निवडा, याठिकाणी जाहीर चर्चा करा, अथवा बिनशर्त माफी मागा, असा अल्टिमेटन नितेश राणेंनी जावेद अख्तरांना दिला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. ते म्हणाले होते की, भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटना अफगाणिस्तानातील तालिबान सारख्याच कट्टरतावादी आहेत. भारतीय संविधान त्यांना अडसर ठरत आहे. यांना थोडीही संधी मिळाली तर या संघटना मागे हटणार नाहीत. भारतात अल्पसंख्यांकाबद्दल मॉब लिंचिंग सारख्या घटना घडणे म्हणजे तालिबान बनण्याची रंगीत तालिम आहे. हे सर्व लोकं एकच आहेत, फक्त त्यांची नावं वेगवेगळी आहेत. अशा आशयाचं विधान जावेद अख्तर यांनी केलं होतं. त्यानंतर देशभर वादंग निर्माण झाला आहे.

Leave a Reply