गडचिरोली : ६ सप्टेंबर – कोरची मुख्यालयापासून अंदाजे ३५ किमी अंतरावर पोलिस मदत केंद्र कोटगुल अंतर्गत येत असलेल्या देऊळभट्टी येथे आज सकाळी सुमारे ८.३० वाजताच्या दरम्यान पतीने पत्नीचे लोखंडी सळाखीने वार करून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी त्रिपुरारी बंजारे (३५) हा छत्तीसगढ़ येथील राजनांदगांव जिल्ह्यातील करमतरा येथील रहिवासी आहे. सदर व्यक्ती हा मानसिकदृष्ट्या कमजोर असल्यामुळे मुलीच्या वडीलाने आपल्या मुलीला व जावयाला आपल्या गावी हवाबदल होईल, या कारनाने स्वगावी देऊळभट्टी येथे बोलविले होते.
आज सकाळी सुमारे ८.३० वाजताच्या दरम्यान त्रिपुरारीची पत्नी मंगेश्वरी त्रिपुरारी बंजारे (३०) जेवन करीत असताना आरोपी त्रिपुरारी याने लोखंडी सळाखीने वार केले असता मंगेश्वरी ही कोसळून खाली पडली. तीला लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल येथे दाखल करून ग्रामीण रुग्णालय कोरची येथे रेफर करण्यात आले असता डॉ. विटनकर यांनी तिला मृत घोषित केले. तिचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय कोरची येथे करण्यात आले असून मंगेश्वरीला ५ वर्षाचा मुलगा व ३ वर्षाची मुलगी आहे. पुढील तपास पोलिस मदत केंद्र कोटगुल येथील पोलिस उपनिरीक्षक शिवाल करीत असून प्राथमिक तपास कोरची पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद गोडबोले करीत आहेत.