येत्या दोन दिवसात शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल – बच्चू कडू यांनी दिली माहिती

नागपूर : २ सप्टेंबर – महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याबाबतची स्थिती, भाजप कडून होणार यंत्रणांचा वापर आणि विधान परिषदेच्या बारा जागांबद्दल राज्यपालांची भूमिका यासंदर्भात भाष्य केलं. शाळा सुरु करण्यासंदर्भा राज्य सरकारचा विचार सुरु असून त्यासंदर्भात लवकरचं निर्णय होईल, असं बच्चू कडू म्हणाले.
शाळा कधी सुरु होणार?
महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे, मात्र इतर राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, असंही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं. शाळा सुरु करण्यासाठी टास्क फोर्सच्या सूचना लक्षात घेऊन एसओपीत बदल केल्यानंतर नवी कार्यप्रणाली जाहीर केली जाणार आहे.
काल सीबीआय ने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला कुठलीही नोटीस न देता ताब्यात घेतलं. त्यामुळं भाजप ईडी आणि सीबीआयचा वापर करत असल्याचं स्पष्ट झालंय, असाही आरोप बच्चू कडू यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारच्यावतीनं नोव्हेंबर 2020 ला विधान परिषदेच्या 12 जागांसाठी नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. याविषयी बोलताना बच्चू कडू यांनी राज्यापालांवर निशाणा साधला आहे. 12 आमदारांच्या नियुक्ती वर राज्यपाल निर्णय घेत नाही, त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव आहे, त्यामुळं त्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलीय.

Leave a Reply