राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले समन्वय बैठकीचे आयोजन, देशभरातील पदाधिकारी येणार नागपुरात

नागपूर : १ सप्टेंबर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समन्वय बैठकीचं आयोजन केलं आहे. नागपुरात ही बैठक होत आहे. येत्या २ ते ७ सप्टेंबर दरम्यान, या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरातील पदाधिकारी या बैठकीसाठी येणार आहेत. हे पदाधिकारी आज रात्रीपर्यंत नागपुरात दाखल होणार आहेत.
देशातील सध्याची राजकीय स्थिती, आगामी निवडणुका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यकारिणी अशा विविध विषयांवर मंथन या बैठकीत अपेक्षित आहे. त्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय स्तरावरचे विविध विभागाचे पदाधिकारी या बैठकीला येणार आहेत.
सरसंघचालक मोहन भागवत, सर कार्यवाहक दतात्रय होसबळे या बैठकीला उपस्थित असतील. संघाच्या पुढील कार्यक्रमावर चिंतन होणार असून, वर्षभराच्या कामाची रुपरेषा या बैठकीत ठरणार आहे.
दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ३५ देशातल्या जवळपास १० लाख तरुण-तरुणींना ऑनलाईन संबोधीत केलं होतं. या कार्यक्रमाला देशविदेशातील अनेक तरुणांनी हजेरी लावली होती. यामध्ये ४० विद्यार्थी नेते, काही मार्गदर्शक, अजय पीरामल, जनरल व्ही.पी. मलिक, पी.टी. उषा यांनीही सहभाग नोंदवला होता.
जगभरात धार्मिक मुद्यांच्या आधारावर फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी भारत हा विविधतेला स्वीकारणारा देश असल्याचं म्हटलं होतं. भारताला एक व्हायचंय. कारण जग हे एकच आहे. जगात एक होण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक प्रकार असाही आहे की, जे फिट आहे त्याला ठेवायचं आणि जे अनफिट आहे त्याला काढून टाकायचं. पण तो आपला मार्ग नाही. याला युनाईट होणं म्हणत नाहीत. भारत हा सर्व प्रकारच्या विविधतांना स्वीकारतो आणि एखाद्या गोष्टीत फरक असेल तर तो न मिटवता एकत्र चालत रहातो.

Leave a Reply