महाविकास आघाडीमधील नाराज नेते स्वतःहून रात्रीच्या अंधारात आम्हाला भेटायला येतात – चंद्रकांत पाटील

अमरावती : १ सप्टेंबर – केंद्र सरकारच्या माध्यमातून तपास यंत्रणा मागे लावून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे षडयंत्र भाजपाकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला होता. मंत्री यशोमती ठाकूर यांच्या या आरोपाला प्रत्त्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांना फोडण्याचे काम आमचे नसून महाविकास आघाडीमधीलच नाराज नेते स्वतःहून रात्रीच्या अंधारात आम्हाला भेटायला येत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला आहे. चंद्रकांत पाटील सध्या तीन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
राजकारणात फोडाफोडी होत असते. आम्ही फोडायचे काम करत नाहीत. परंतु महाविकास आघाडीमधील नाराज लोकांना आधी सांभाळा, असा सल्लाही यावेळी चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. ईडीची यादी माझ्याकडे नसून सर्वसामान्य लोकांकडून असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, राज्यात मंदिरेही उघडावी लागतील. अण्णा हजारे यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. जर मंदिरे उघडली नाहीत तर आम्ही बळजबरीने उघडू, असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिला.
चंद्रकांत पाटील हे आजपासून तीन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जवळपास पाच तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांच्या ते भेटी घेणार आहेत. चंद्रकांत पाटील यांनी आज वरुडमधून या दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांच्या भेटी, पक्षाची मोटबांधणी तसेच अनेक पदाधिकाऱ्यांचे प्रवेशसुद्धा पक्षात करून घेतले जाणार आहेत. सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करण्याची शक्यता आहे.

Leave a Reply