देशात हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंतच देशाचं संविधान आणि महिला सुरक्षित – सी टी रवी

नवी दिल्ली : १ सप्टेंबर – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव सी टी रवी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. देशात हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंतच देशाचं संविधान आणि महिला सुरक्षित आहेत असा दावा रवी यांनी केलाय.
जेव्हापर्यंत या देशात हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान सुरक्षित राहील. जेव्हापर्यंत हिंदू बहुसंख्या राहतील तोवरच समान संधी उपलब्ध होतील. पण एकदा का हिंदू अल्पसंख्यांक झाले तर गंधार (अफगाणिस्तान) सोबत जे झालं तेच भारतातही होईल, असं रवी यांनी म्हटलंय. ज्या नागरिकांना आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं संरक्षण करायचं असेल त्यांनी हे ‘सत्य’ विसरू नये, असं आवाहनही त्यांनी केलंय. उल्लेखनीय म्हणजे, संविधानाशी छेडछाड करत नवे कायदे निर्माण करण्याचा आरोप भाजपवर विरोधकांकडून अनेकदा करण्यात आलाय.
‘धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक सहिष्णुता हा हिंदूंचा मूळ विश्वास आहे. जेव्हापर्यंत सहिष्णुतेवर विश्वास असणारे लोक बहुसंख्य राहतील तेव्हापर्यंत धर्मनिरपेक्षता कायम राहील. महिला सुरक्षित राहतील. सहिष्णुता असणाऱ्या लोकांची संख्या घटली तर अफगाणिस्तानसारखी परिस्थिती निर्माण होईल. जेव्हा ते (गैर-हिंदू) बहुसंख्यांक होतात तेव्हा ते शरीयत कायदा लागू करण्याच्या गोष्टी करतात, आंबेडकरांच्या संविधानाच्या नाही’, अशी भीतीही भाजप नेत्यानं जाहीर भाषणात व्यक्त केलीय.
भाजप नेते रवी यांनी यावेळी असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया च्या विचारधारेची तुलना तालिबानशी केलीय. एआयएमआयएम कर्नाटकातील तालिबान आहे. एआयएमआयएम आणि एसडीपीआयची विचारधारा तालिबानसारखी आहे. कलबुर्गीचे लोक तालिबानी विचारधारा नाकारून आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपलाच बहुमतानं जिंकून आणतील, असं आवाहनही रवी यांनी जनतेला केलंय.

Leave a Reply