नाल्याच्या पुलावरून दोघे गेले वाहून, एकाचा मृतदेह सापडला दुसऱ्याचा शोध सुरु

यवतमाळ : ३१ ऑगस्ट – वणी तालुक्यातील राजूर-नांदेपेरा दरम्यान असलेल्या सोनापूर येथील सतीश देठे (४०), बालू उईके (४०) हे दोघे सोनापूर नाल्याच्या पुलावरून वाहून गेले. सोमवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. रात्रभर दोघांचाही शोध सुरू होता. अखेर सतिश देठे यांचा सकाळी गावालगत मृतदेह आढळून आला. तर बालू उईके यांचा शोध सुरु आहे.
सोमवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला होता. मृत सतिश देठे बेपत्ता असलेले बालू उईके हे शेती करतात. सोमवारी दिनांक ३० ऑगस्ट रोजी कामानिमित्त ते दुचाकीने राजूर येथे गेले होते. रात्री दहा वाजताच्या सुमारास ते परत येत होते. सोमवारी परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सोनापूर नाल्याला पूर आला होता. हा पुल सखल भागात असल्याने मुसळधार पाऊस झाल्यास पुलावरून सुमारे ३ ते ४ फुट पाणी वाहते. नाल्याला पुर आल्याने सतीश देठे आणि बालू उईके यांनी दुचाकी नाल्याच्या बाजूला लावली व त्यांनी पूल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुराच्या पाण्यात ते दोघेही वाहून गेले. दोघेही वाहून गेल्याची माहिती सोनापूर येथील ग्रामस्थांना मिळाली. तेव्हापासून त्यांची शोधमोहीम सुरू होती. सकाळी पुराचे पाणी ओसरले. सोनापूर गावालगतच सुमारे १ किलोमीटर अंतरावर सतीश यांचा मृतदेह आढळून आला आहे. तर बालू अद्याप बेपत्ता आहे.

Leave a Reply