संपादकीय संवाद – आता मंदिरे उघडायलाच हवी

काल भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सर्व मंदिरांसमोर बंद मंदिरे उघडावी यासाठी शंखनाद आंदोलन केले. ८ दिवसात निर्णय न घेतल्यास आम्ही बळजबरीने कुलूप तोडू, असा इशाराही भाजपने दिला आहे. दारूची दुकाने आणि हॉटेल उघडले जातात मग मंदिरे का नाही? असा भाजपचा सवाल आहे.
राज्यातील बंद मंदिरे उघडली जावी, ही भाजपसह अनेकांची दीर्घकालीन मागणी आहे. मंदिरे बंद राहिली तर श्रद्धाळू भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येत नाही, हे एक प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर अनेकांची रोजीरोटी आणि अर्थकारणही या मंदिरांवर अवलंबून असते. मंदिर म्हटले की, मंदिरात असलेले पुजारी, हे प्रमुख व्यक्तिमत्व मानले जाते मोठ्या मंदिरात पुजाऱ्याला नियमित वेतनही दिले जाते. त्याचबरोबर येणारे अनेक भाविक पुजाऱ्याच्या हातात काही ना काही दक्षिणा ठेवतात, सोबत नारळ, पेढे प्रसंगी कापड असेही या गुरुजींना दिले जाते. मंदिरे बंद असल्यामुळे त्यांचीही कमाई थांबलेली आहे. त्याचबरोबर मंदिरात असलेल्या सेवकांचीही रोजीरोटी ठप्प झालेली आहे.
मंदिर म्हटले की मंदिराबाहेर असलेली दुकाने, ओघानेच आली. तिथे हार, फुले, पूजेचे साहित्य प्रसादाचे साहित्य हे सर्व तर मिळतेच त्याचबरोबर मंदिरात येणारा भाविक इतर काही वस्तू असल्या तर त्यांचीही खरेदी करून येतो मंदिराभोवती असे अनेक दुकानदारांचे उत्पन्नाचे साधन या मंदिरबंदीमुळे हिरावले गेले आहे. त्याचबरोबर मंदिरासमोर बसणारे भिकारी हेही आज पूर्णतः निराधार झाले आहेत.
हे सर्व मुद्दे लक्षात घेऊनच मंदिरे सुरु करावी असा आग्रह केला जातो आहे. आज लोकलमध्ये प्रवासी सुरु केले, बससेवाही सुरु केली तिथे सरकारने नियम लावले आहेत, दारूची दुकाने आणि हॉटेलही सुरु केली तिथेही नियमावली जाहीर केली आहे, राजकीय पक्षांचे मेळावे आणि आंदोलने तर कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून पार पाडले जातात. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरुद्ध शिवसेनेने राज्यभर आंदोलने केली तिथे कोरोनाचे नियम पुरते गुंडाळून ठेवले होते, मग मंदिरांनाच विरोध का? असा भाविकांचा सवाल आहे. मंदिरांसाठीही नियम बनवा आणि मंदिरे खुली करा अशी भाविकांची मागणी आहे. या संदर्भात राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी मंदिरात बंद असलेल्या देवदेवतांनी राज्य सरकारमधल्या कर्त्या करवीत्यांना सद्बुद्धी द्यावी, इतकीच प्रार्थना आज आपण परमेश्वराजवळ करू शकतो.

अविनाश पाठक

Leave a Reply