मुंबई : ३१ ऑगस्ट – महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. तसेच दहीहंडी उत्सवात गर्दी होते त्यामुळे यंदा रद्द करण्याचे गोविंदा पथकांना आवाहन केले. यानंतर मनसे आणि भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं. दहीहंडी उत्सव साजरा करण्याची तसेच मंदिरे पुन्हा सुरू करण्याची मागणी करत मनसे, भाजपच्या आंदोलनावरुन मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षांना जोरदार टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, दुर्दैवाने काय झालेलं आहे, जनता जगली काय आणि त्यांचे प्राण गेले काय आम्हाला १०० टक्के राजकारण करायचं आहे असं सुरू आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असतानाही आम्हाला यात्रा काढायच्या आहेत. आम्हाला जनतेसाठी सोयी सुविधा काही करायच्या नाहीयेत पण त्यांचे जीव कदाचित धोक्यात येतील असे समारंभ करायचे आहेत का तर आम्हाला जनतेचे आशीर्वाद पाहिजेत. कशाला आशीर्वाद हवेत जनतेचे जीव धोक्यात घालायला? असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवरुन टोला लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं, काही जणांनी म्हटलं दहीहंडी साजरी करा नाही तर आम्ही अमूक करू… हे काय स्वातंत्र्य युद्द नाहीये की, कोरोनाचे नियम तोडून आम्ही करून दाखवलं. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियम ठरवले आहेत. हा काय सरकारी कार्यक्रम नाहीये त्याला विरोध करायला. जगात आज ज्या काही गोष्टी मानल्या आहेत, मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे ते जर पाळले नाही तर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.
हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोराना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की, केंद्राने देखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.