अमरावतीतील एका हॉटेलला लागलेल्या आगीत नागपूरच्या व्यावसायिकाचा गुदमरून मृत्यू

अमरावती : ३१ ऑगस्ट – राजापेठ पोलिस ठाण्यासमोर असलेल्या हॉटेल इंपेरियलला आज पहाटे ३ वाजता भीषण आग लागली. या आगीच्या धुराने गुदमरून नागपुरातील एका केबल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. हॉटेलचे दहा लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दिलीप चंद्रकांत ठक्कर (वय ५५ रा. नागपूर) असे मृतक केबल व्यावसायिकाचे नाव आहे. केबल नेटवर्कच्या कामासाठी ते अमरावतीला आले होते व सदर हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. दरम्यान आज पहाटे हॉटेलला अचानक आग लागली.
आग लागल्याचे लक्षात येताच पोलिस कर्मचारी धावले, अग्निशमन विभागाचे पथकही पोहचले. आग लागताच हॉटेलच्या खोल्यांमध्ये धूर दाटला. त्यातल्याच एका खोलीत दिलीप ठक्कर होते. श्वास गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. अन्य पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. सर्वांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

Leave a Reply