वॉटर स्पोर्टस्‌, फ्लोटिंग रेस्टॉरंट, बोटींगची नागपूरकरांना भेट द्या : नितीन गडकरी

नागपूर : ३० ऑगस्ट – गांधीसागर तलावात अनेक ड्रेनेज लाईन गेल्या आहेत. त्याचा शोध लावून तलावात येणारे घाण पाणी थांबवा. गांधीसागरचे खोलीकरण करून त्यातील माती शेतकऱ्यांना द्या. खोलीकरणामुळे पाणी साठवण क्षमता वाढेल. महाल परिसरात मनोरंजनाचे साधन नाही. त्यामुळे गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणासोबतच येथे वॉटर स्पोर्टस्‌, फ्लोटिंग रेस्टॉरंट, बोटींगची संकल्पना प्रत्यक्षात साकार करून नागपूरकरांना महानगरपालिकेने अनोखी भेट द्यावी, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १७ मधील गांधीसागर तलावाच्या विकास व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तर महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री गिरीश व्यास, प्रवीण दटके, विकास कुंभारे, मनपातील सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, धंतोली झोन सभापती वंदना भगत, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिव्या धुरडे, नगरसेवक प्रमोद चिखले, ॲड. संजय बालपांडे, विजय चुटेले, सरला नायक, लता काडगाये, नेहा वाघमारे, हर्षला साबळे, माजी महापौर तथा नगरसेविका नंदा जिचकार, माजी महापौर अर्चना डेहनकर, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, भाजप मध्य नागपूर अध्यक्ष किशोर पलांदूरकर, धंतोली झोनचे कार्यकारी अभियंता उज्ज्वल धनविजय, ध्रुव कन्स्ल्टंसीचे संदीप जोशी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये होत असलेल्या आणि भविष्यात प्रस्तावित असलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा उहापोह केला. ते म्हणाले, गांधीसागर तलावातून चार ते सहा आसनी ‘वॉटर टॅक्सी’ सुरू करता येईल का, यादृष्टीने विचार करावा. गांधीसागर येथून खिंडसी तलाव येथे या ‘वॉटर टॅक्सी’मधून जाता येईल. नागरिकांच्या दृष्टीने हे अभिनव असेल. पावसाचे रस्त्यावर पडणारे पाणी गांधीसागर मध्ये नेता येईल का, यादृष्टीनेही नियोजन करता येईल. मात्र, तलावात येणाऱ्या सिवरेज लाईन जोपर्यंत बंद होणार नाही, तोपर्यंत हा तलाव शुद्ध होणार नाही. असे घाण पाणी शुद्ध करण्यासाठी ‘एरिएशन’ नावाची एक पद्धत आहे. त्याचाही विचार महानगरपालिकेने करावा. नागपुरात झालेला डबलडेकर पूल हा देशातील एकमेव आहे. जर दोन मजली पूल बांधता येतो तर तीनमजलीही बांधता येईल, असा विचार करून आता पुणे, चेन्नई, रांची, जमशेदपूर येथे हा प्रयोग प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथील पूल शिरूर ते वाघोली प्रस्तावित असून त्याची लांबी ५० किलोमीटर राहील. सहा हजार कोटी त्यावर खर्च होईल. असे नवे प्रयोग करून इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत नागपूर देशातील क्रमांक एकचे शहर करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच वायूप्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत नागपूर शहराला आंतरराष्ट्रीय बेंच मार्कपर्यंत न्यायचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. नागनदीसाठी २४०० कोटी मंजूर झाले असल्याचे सांगत यातूनही जलवाहतूक सुरू करण्याचे स्वप्न लवकरच साकार होईल, असा विश्वास त्यांनी दिला. महापौरांनी सुचविलेल्या चिटणीस पार्कच्या विकासासंदर्भात बोलताना त्यांनी वेगळी संकल्पना मांडत १५० ते २०० कोटी देण्याची तयारी दर्शविली. यासाठी त्याचे डिझाईन आंतरराष्ट्रीय आर्किटेक्टकडून करण्याची सूचना त्यांनी केली.

तत्पूर्वी दीपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक प्रमोद चिखले यांनी केले. आभार गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक यांनी मानले.
उर्वरीत निधीही देऊ : फडणवीस
नागपुरातील गांधीसागर तलावाला गौरवशाली इतिहास आहे. हा तलाव नागपूरचे वैभव आहे. आपण महापौर असताना हेरिटेज कमिटीच्या जोखंडात तलावाचा विकास अडकला. मात्र मुख्यमंत्री असताना या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर केला. त्यावेळी अर्धा निधी मंजूर केला असला तरी तो पूर्ण मिळावा यासाठी विरोधी पक्ष नेता असलो तरी शासनाकडून तो मिळवून देऊ, असा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. यावेळी त्यांनी नागपूरच्या सर्वांगीण आणि चौफेर विकासाचे शिल्पकार म्हणून ना. नितीन गडकरी यांचा उल्लेख केला. गेल्या पाच-सात वर्षांत ना. गडकरींच्या नेतृत्वात नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलला. या विकासातही नागपूरने वेगळेपण जोपासले. विकासासोबतच ग्रीन नागपूरची संकल्पना सत्यात उतरविण्याचा प्रयत्न केला. आता सुरू असलेले आणि प्रस्तावित सर्व प्रकल्प पूर्ण होतील तेव्हा नागपूर देशातील सर्वात सुंदर शहर असेल, असे ते म्हणाले. मलजल प्रक्रियेत नागपूर हे देशासाठी ‘मॉडेल ठरले तर मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून नागपूरची नवी ओळख तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आता चिटणीस पार्कच्या विकासाचे स्वप्न : महापौर
नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या दोघांच्या नेतृत्वात नागपूर शहराचा विकास होतो आहे. या मालिकेत मध्य नागपुरातील रा.पै. समर्थ स्टेडियम चिटणीस पार्कचा कायापालट व्हावा, त्यासाठी ना. नितीन गडकरी यांनी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौर दयाशंकर तिवारी यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून केली. नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. ७५ हेल्थ पोस्टची सुरुवात २ ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीपासून करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply