निराधार वृद्ध महिलेची हत्या करून तिचे दागिने चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना अटक

अकोला : ३० ऑगस्ट – माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना महाराष्ट्रातील अकोल्यात घडली आहे. येथील दोन जणांनी एका निराधार वृद्ध महिलेच्या घरात शिरून अमानुष कृत्य केलं आहे. आरोपींनी निराधार वृद्ध महिलेच्या घरात शिरून तिची हत्या करत गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास राजूर पोलीस करत आहेत.
कांताबाई तुकाराम जगधने असं हत्या झालेल्या निराधार वृद्ध महिलेचं नाव आहे. त्या अकोला जिल्ह्यातील आंभोळ येथील रहिवासी आहेत. त्यांची काळजी घ्यायला घरी कोणी नसून त्या आंभोळ शिवारात घरी एकट्याच राहतात. तर आरोपीही मृत महिलेच्या घरापासून काही अंतरावरच राहतात. वृत्तानुसार, मृत कांताबाई यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या घराची कौलं बसवण्याचं काम गावातील एका व्यक्तीला दिलं होतं.
संबंधित व्यक्तीनं कांताबाई यांच्या घराला कौलं बसवून दिली. पण त्याची नजर निराधार वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिन्यांवर पडली. दरम्यान आरोपी व्यक्तीनं आपल्या अन्य एका मित्राच्या मदतीनं वृद्ध महिलेचे दागिने लुटण्याचा प्लॅन आखला. त्यानंतर आरोपींनी रात्री कोतूळ गावात मद्यपान केलं आणि रात्री उशीरा अंधाराचा फायदा घेत कांताबाईंच्या घरात शिरले.
यानंतर आरोपींनी कोणालाही काही कळायच्या आत कांताबाईंची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या गळ्यातील दागिने घेऊन दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही तासांताच पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे. अकोला आणि राजूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलीस दोघांची चौकशी करत असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply