राज्यात कायद्याचं राज्य आहे तर सरकारने अनिल परब यांना स्वत:हून अटक करावी – चंद्रकांत पाटील

पुणे : २९ ऑगस्ट – राज्यात कायद्याचं राज्य आहे, या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. राज्यात कायद्याचं राज्य आहे तर सरकारने अनिल परब यांना स्वत:हून अटक करावी, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी तीन ट्विट करून संजय राऊतांवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. “महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे.” असे संजय राऊत म्हणाले होते. त्यामुळे अनिल परब यांना हे सरकार स्वतःहून अटक करेल अशी शक्यता आहे. अनिल परब यांच्याविरोधातील तक्रार तयार आहे. जर सरकारने स्वतःहून अटक केली नाही, तर आम्ही लवकरच तक्रार दाखल करू, असा इशारा पाटील यांनी दिला.
शिवसेना खासदार संजय राऊत हे जनतेतून निवडून येत साधे नगरसेवकही झाले नाहीत, त्यामुळे कोण शहाणं आणि कोण वेडं हे त्यांनी ठरवू नये. तो अधिकार केवळ मतदारांनाच असतो आणि मतदार सुज्ञ आहेत. मतदानाच्या वेळी मतदार आपला अधिकार चोख बजावतील, असा टोला त्यांनी लगावला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकारने आपल्या अखत्यारीत येणारे सर्व प्रश्न सोडवले असून आता अनेक गोष्टी राज्य सरकारच्याच हाती आहेत. त्यामुळे आपल्याच निष्काळजीपणामुळे गेलेले आरक्षण मराठा समाजाला पुन्हा मिळवून देण्यासाठी आतातरी महाविकास आघाडी सरकारने ठोस पाऊले उचलावीत, असं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, राऊत यांनी राणेंवर जोरदार हल्ला करताना राज्यात कायद्याचे राज्य असल्याचं म्हटलं होतं. राणे महाराष्ट्रात येऊन ज्या प्रकारची विधाने करीत आहेत तो केंद्रीय मंत्री म्हणून मर्यादांचा, परंपरांचा भंग आहे व पंतप्रधान मोदी यांनी वेळीच दखल घेतली नाही तर त्याचे फार मोठे परिणाम भाजपला भोगावे लागतील. महाराष्ट्रातील चार शहाण्यांनी पुढे येऊन राज्यातील पेंढाऱ्यांचे कान उपटावेत, अन्यथा राज्याची घडी विस्कटेल, असा इशाराही राऊतांनी सरतेशेवटी अग्रलेखातून भाजपला दिला आहे.

Leave a Reply