नाग नदी स्वच्छतेसाठी २४०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी – नितीन गडकरींनी दिली माहिती

नागपूर : २४ ऑगस्ट – नाग नदीच्या स्वच्छतेसाठी चोवीसशे कोटी रुपयांच्या तरतुदीला केंद्रीय वित्त समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे नाग नदी स्वच्छता मोहिमेतील मोठा तांत्रिक अडसर दूर झाला आहे,’ अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली.
सोनेगाव तलाव सौंदर्यीकरण भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, ‘नागपूरला ध्वनी, जल, वायू अशा सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त करत शहराचा सर्वांगिण विकास साधायचा आहे. मिहानमध्ये आतापर्यंत ५७ हजार युवकांना रोजगार दिला आहे. येत्या ९ सप्टेंबरला विविध कंपन्यांसोबत बैठक होणार आहे. त्या माध्यमातून सुमारे एक लाख युवकांना रोजगार प्राप्त होईल.’
या प्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. उपस्थित होते. प्रास्ताविक महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. याप्रसंगी राज्यसभा खासदार विकास महात्मे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी महापौर संदीप जोशी उपस्थित होते.
२०३० पर्यंत नागपूरचा समावेश आशियातील प्रथम दहा आंतरराष्ट्रीय शहरामध्ये होईल. नागपूर सध्या शिक्षण हब म्हणून विकसित होत आहे. पुढे याचे रूपांतर वाणिज्य हबमध्ये होणार आहे, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Leave a Reply