केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका ‘अज्ञाना’वरून केलेल्या टीका टिप्पणीवर भाष्य करताना मला त्याबद्दल जास्त बोलायचे नाही, ती त्यांची संस्कृती आहे असे म्हटले आहे. वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी दोन ओळींचे मोघम उत्तर दिले अन् गाडीतून चालते झाले, असो. आता या छोट्याशा प्रतिक्रियेची चर्चाहि होवू लागली आहे. आता प्रश्न पडतो ती त्यांची म्हणजे नेमके कोणाची संस्कृती आहे. राणेची की परंपरेनं आजवर चालत आलेली शिवसेनेची. शिवसेनेची ही बोचरी संस्कृती म्हणजे रोखठोक – भीडमुर्वत केलेली विधाने. या विधानांना त्यांनी विशेषणे देवून आलंकृत केले आहे. मग ती स्तुतीपर असोत की शिवराळ. श्री शरदचंद्र पवार ही संस्कृती चांगल्या प्रकारे जाणतात. कारण ते कुणीतरी मढविलेले जाणते राजे आहेत. ज्यांना सर्व काही समजते अन् जाणता येते तो जाणता. आता त्यांना कुणी अजाणता राजा ठरवित असेल हा भाग वेगळा.
पण अलीकडच्या राणेंच्या ‘त्या’ काय तर म्हणे आक्षेपार्ह शाब्दिक कलापावरून पवार साहेबांना प्रश्न विचारताच या जाणत्या राजाला ‘मैद्याचं पोतं’ आठवलं असेल म्हणून त्यांनी मोघम नाव न घेता ती त्यांची संस्कृती आहे असे म्हटले असावे. नारायण राणे हे महाशय मूळ शिवसेनेतले. ते शिवसेनेत कसे व कुणामुळे प्रवेशले तेहि सर्वज्ञात आहे. या एकेकाळच्या सेनेला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीच मुंबईतल्या वाढत्या अंडरवर्ल्ड कारवायांना ब्रेक लावण्यासाठी उब दिली म्हणतात. सांगण्याचे तात्पर्य नारायण राणे शिवसेनेचे त्यामुळे शिवसेनेची रोखठोक संस्कृतीहि उगाळून पिलेले. म्हणतात ना, सुंभ जळाले तरी पीळ कायम रहातो. राणे काय अलीकडील उद्धव ठाकरे काय हे हि एकाच माळेचे संस्कृतीतले. त्यातूनच काल्परवाची ही शाब्दिक झडप झाली, एखाद्या कुस्तीतल्या सारखी. पवार साहेबांना जसे नारायण राणे माहीत तसे उद्धव ठाकरेही माहीत. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेली (सुसंस्कृत (!) प्रतिक्रिया दोघांनाही लागू पडते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तर शरद पवारांवर शरसंधान साधताना त्यांना चक्क जाहीर सभांमधून ‘मैद्याचं पोतं’ म्हणून हिणवायचे, नाही का…?
तसं पाहिलं तर राकॉ सुप्रीमो शरद पवार यांची संस्कृती कोणती बरे ? ती तर सर्वज्ञात, सर्वश्रुत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी समोरच्या पक्ष, नेत्या, कार्यकर्त्यांचा छान विश्वासघात करायचा ही त्यांची सुसंस्कृत संस्कृती. राजकारणात गलिच्छ खेळी खेळत त्यांनी हा हा म्हणता चांगल्या चांगल्या महाभागांना उतरीवले, नव्हे नामोहरम केले. हा एक जिता जागता पाठीत खंजीर खुपसणारा पवार साहेबांचा इतिहास नव्हे तर विश्वासघातकी संस्कृती होय.
माधव पाटील