सोलापूर : २७ ऑगस्ट – सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना एका शेतकऱ्याने दोन एकरामध्ये गांजा लावण्यासंदर्भात परवाणगी मागणारं पत्र लिहिलं आहे. अनिल आबाजी पाटील असं पत्र लिहिणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे राहणाऱ्या पाटील यांनी लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे. माझी शिरापूर येथे दोन एकर जमीन असून तिथे मला गांजा लागवडीची परवानगी द्यावी असं पाटील यांनी म्हटलं आहे.
मी शेतकरी असून कोणतेही पिक घेतलं तरी त्याला शासनाचा हमी भाव नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही. त्यामुळे गांजाला चांगला भाव असल्यामुळे मला माझ्यावर जमीनीवर दोन एकरात गांजा लागवड करण्याची परवानगी १५ सप्टेंबरपर्यंत लेखी द्यावी नाहीतर मी १६ सप्टेंबर रोजी आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली अशं गृहित धरुन लागवड सुरु करणार आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील, असा उल्लेख या पत्रात आहे.
हे पत्र २५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वीकारल्याचा स्टॅम्प त्यावर आहे. पोलीस अधिकक्षकांनाही यासंदर्भातील एक प्रत पाठवण्यात आल्याचा उल्लेख या पत्रावर आहे.