आ. संजय गायकवाडांविरोधात बुलढाण्यात ठिकठिकाणी निदर्शने

बुलडाणा : १९ एप्रिल – कोरोना चाचणी, लसीकरण आणिर रेमडेसिवीरच्या काळाबाजारावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुठल्याही स्तराला जाऊन टीका करत आहेत. सध्या राज्यासह देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. विरोधीपक्ष मदत करायचे सोडून राजकारण करत आहे. ‘मला जर कोरोना विषाणू मिळाले, तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेन,‘ असे शिवराळ भाषेत घाणेरडे वक्तव्य आ. संजय गायकवाड यांनी केले. या वक्तव्याचे पडसाद संपुर्ण जिल्हाभरात भाजपाच्या कार्यकर्त्यात उमटले. बुलडाणा, चिखली, देऊळगांवराजा, मोताळा, खामगांव, जळगांव जामोद येथे भाजपाच्या पदाधिकारी व कायर्र्कर्त्यांनी शिवसेना आ. गायकवाड यांच्या पुतळयाचे दहन करून तिव्र निषेध नोंदविला. बुलडाणा येथे जयस्तंभ चौकात भाजपा व शिवसेना कार्यकर्त्यात पुतळया जाळण्याच्या कारणावरून शाब्दीक वाद झाला. त्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यात हाणामारी होऊन माजी आ. विजयराज शिंदे व भाजपा कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
आ. संजय गायकवाड़ यांचा पुतळा जाळण्यासाठी जयस्तंभ चौक येथे पोहोचलेल्या भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आले. दरम्यान शिवसैनिकांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या हातातील पुतळा हिसकावून घेत असतांना दोन्ही कार्यकर्त्यात हाणामारी झाली. विजयराज शिंदे यांच्या सहित तीन ते चार भाजपा कार्यकर्त्यांवर शिवसैनिकानी हल्ला चढविला. भाजपा कार्यकर्ते आ. गायकवाड़ यांचा पुतळा जाळण्यासाठी आले होते. तेव्हा धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे युवा आघाडीचे पदाधिकारी कुणाल गायकवाड़ यांनी भाजपा कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही गटात धडपकड झाली. माजी आ. शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप करीत आहे.
त्यांच्या डोळयाला जखम झाली आहे. पोलिसांच्या मध्यस्थिने दोन्ही गटाना वेगळे करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री योगेंद्र गोड़े, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, नगरसेवक अरविंद होंडे, विठ्ठल येवले, मंदार बाहेकर, यतिन पाठक, प्रभाकर वारे, सोनू बाहेकर, अॅतड. दशरथ राजपूत, सोहम घाडगे, दत्ता पाटील, गौरव राठोड, नितीन बेंडवाल, करण बेंडवाल तसेच अनेक भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पुतळा हिसकावण्यासाठी आलेल्या शिवसैनिकात कुणाल गायकवाड, श्रीकांत गायकवाड़, बाळासाहेब धुड, बंडू आसाबे, संदीप पुराणिक तसेच अनेक जण सहभागी होते. याप्रकरणी पोलिस स्टेशनला दोन्ही गटाचे कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी दाखल झाले. वृत्त लिहीत्तोर गुन्हा दाखल झालेला आहे.

Leave a Reply