घ्या समजून राजेहो – नारायण राणे अटकनाट्यात उद्धव ठाकरेंनी काय कमावले काय गमावले

काल २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात एक हाय व्होल्टेज नाट्य घडले परिणामी महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्र अक्षरशः ढवळून निघाले होते. सकाळी नाशिकमधून सुरु झालेले हे नाट्य रात्री १२च्या सुमारास महाडमध्ये संपले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच राज्य सरकारने एका केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा प्रकार घडला. काल रात्री हे नाट्य संपलेले दिसत असले, तरी त्याचे दूरगामी परिणाम होणार हे निश्चित आहे. यामुळे महाराष्ट्रात राज्य आणि केंद्र यांच्यात नवा संघर्ष उभा राहू शकतो, असे संकेत आता मिळत आहेत.
या हाय व्होल्टेज नाट्यातील प्रमुख पात्रे म्हटल्यास उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे दोघेच आहेत. त्याहीपुढे जाऊन नारायण राणेंना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हे नाट्य घडवले असे बोलले जाते आहे. या नाट्यात कुणी काय कमावले आणि काय गमावले, याचा लेखाजोखा या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सध्या केंद्रात मंत्री असलेले नारायण तातोजी राणे हे मुळात जुने शिवसैनिक आहेत. शिवसेनेत सध्या शिवसैनिकापासून तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत ते वर चढले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे ते लाडके शिवसैनिक होते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. २००१ च्या दरम्यान उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले. बाळासाहेब ठाकरेंनी हळूहळू सर्व सूत्रे उद्धव ठाकर्यांकडे सोपवणे सुरु केले. त्यांचे आणि नारायण राणेंचे पटेनासे झाले. परिणामी, २००५ मध्ये नारायण राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काही वर्षे काँग्रेसमध्ये काढल्यावर त्यांनी काही काळ स्वतःचा पक्ष काढला, सुमारे तीन वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये डेरेदाखल झाले. भाजपने राणेंच्या एका मुलाला आमदार केले तर राणेंना राज्यसभेत पाठवले.
या काळात नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु होता. राणे हे मूळचे शिवसैनिक आणि अतिशय आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. भाजपने त्यांचा फायदा करून घेण्याचे ठरवले, १९८८ च्या दरम्यान भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती ही युती काल -परवापर्यंत कायम होती. मात्र या काळात शिवसेनेने भाजपला प्रचंड छळले अखेरच्या क्षणी धोकेबाजी करून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती केली आणि सरकार स्थापन केले, हे शल्य भाजप नेत्यांच्या मनात कायम राहिलेले आहे. त्यामुळे शिवसेनेला धडा शिकवण्याची खुमखुमी भाजपच्या मनात कायम राहिलेली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, भाजपला शिवसेनेच्या हातून ही सत्ता काढायची आहे, त्यासाठी भाजपने नियोजनही सुरु केलेले आहे. याच नियोजनाचा एका भाग म्हणून नारायण राणेंना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. त्याचा फायदा मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला मिळणार हे उघडे गुपित आहे, त्यानुसार नारायण राणेंनी आपल्या आक्रमक शैलीत मुंबई आणि कोकणचे दौरे सुरु केले. केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार त्यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली. या यात्रेदरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलतांना उद्धव ठाकरेंच्या कानाखाली आवाज करण्याची भाषा केली. लगेचच शिवसेनेने त्यांच्याविरोधात गावोगावी पोलीस तक्रारी दाखल करणे सुरु केले. रात्री उशिरा एक हाय लेव्हल बैठक झाली आणि राणेंना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजकारणात अनेकदा राजकीय नेते आपल्या विरोधकांवर पातळी सोडून टीका करतात, ज्यांच्यावर टीका होते त्यांचे दुखावलेले कार्यकर्ते मग पोलिसात तक्रारही करतात. मात्र अश्या तक्रारींवर तातडीने कारवाई कधीच होत नाही. या प्रकरणात मात्र तडकाफडकी राणेंना अटक करण्याचाच निर्णय घेण्यात आला. इतकी घाई करण्यामागे राजकीय सूडबुद्धीशिवाय दुसरे कोणतेही कारण नव्हते हे उघडच आहे. उद्धव ठाकरेंना नारायण राणेंना अडकवायचे होते, ती संधी त्यांनी घेतली,उद्धव ठाकरे ज्या महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री आहेत, या महाआघाडी सरकारचे करते करविते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आहेत. पवार हे प्रगल्भ नेते म्हणून ओळखले जातात, मात्र त्यांनीही राणेंना अटक करायला परवानगी देऊन टाकली.
केंद्रीय मंत्री भलेही राजकीय विरोधक असला, तरी त्याला अटक करणे टाळले जाते, मात्र या प्रकरणात लवकरात लवकर अटक कशी करता येईल,याची घाई केली गेली. उद्धव ठाकरेंचे निकटस्थ राज्यमंत्रिमंडळातील मंत्री अनिल परब हे पोलीस अधिकाऱ्यांना कसेही करून राणेंना ताबडतोब अटक करा, अश्या आशयाच्या सूचना देत असतानाच एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यातून वास्तव लक्षात येते. प्रस्तुत प्रकरणात जी कलमे लावली गेली, त्या कलमांमध्ये आरोपीला आधी नोटीस देऊन त्याची जबानी घेण्याची तरतूद आहे, मात्र इथे ती तरतूदही धाब्यावर बसवली. कोणतेही वारंट न दाखवता नारायण राणेंना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठीही हेतुपुरस्पर उशीर करण्यात आला. तरीही रात्री उशिरा न्यायालयाने राणेंना जमीन मंजूर केला. जर कायदेशीर कारवाई पूर्ण झालेली असती तर राणेंना जामीन मिळणे सोपे गेले नसते, मात्र इथेही सरकारपक्षाची घिसाडघाई दिसून आली. एकूणच राजकीय सूडभावनेतून ही कारवाई केल्याचे स्पष्ट दिसून आलेले आहे. त्याचबरोबर आम्ही केंद्र सरकारलाही भीक घालत नाही हा संदेश देण्याचा अकारण प्रयत्न केलेला स्पष्ट दिसतो आहे.
राणेंनी शिवसेना पक्षप्रमुखांचा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान केला असे सांगत काल दिवसभर शिवसैनिक रस्त्यावर उतरून राडाही करताना दिसले. त्यांचा राडा हा पोलीस प्रायोजित तर नव्हता ना? अशी शंकाही येत होती. काही राजकीय विश्लेषकांच्या मते राणेंच्या विधानाने काहीशी विस्कळीत असलेली शिवसेना संघटित होण्यास मदत झाली. आणि त्यांनी एकमुखाने उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलणाऱ्याचा निषेध केला, मात्र वास्तव तसे नाही, जर राणेंच्या विधानाची उद्धव ठाकरेंनी दाखलाच घेतली नसती, तर राणेंच्या असंख्य टीकास्त्रांपैकी एक म्हणून लोक विसरूनही गेले असते, इथे मात्र उद्धव ठाकरेंनी राणेंना धडा शिकवण्याच्या फाजील महत्वाकांक्षेपोटी नारायण राणेंना अकारण हिरो केलेले आहे. काल दिवसभर देशभरातील सर्व माध्यमे नारायण राणेँचाच घोष लावत होती. केंद्रात मंत्री झाल्यावर त्यांना जितकी प्रसिद्धी मिळाली नव्हती तितकी प्रसिद्धी उद्धवपंतांच्या या एक खेळीमुळे त्यांना मिळाली. त्याचा फायदा नजीकच्या भविष्यात भाजपला मिळणार हे निश्चित आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत त्याचे परिणाम स्पष्ट दिसून येतील.
इथे आणखी एक धोकाही उद्धवपंतांनी लक्षात घ्यायला हवा, या प्रकरणात कारण नसताना महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारशी सरळ सरळ पंगा घेतलेला आहे. केंद्रात विरोधी सरकार आहे, म्हणून एखाद्या केंद्रीय मंत्र्याला राज्यात अटक करणे हे प्रथा-परंपरेला धरून नाही. या संदर्भात केंद्र सरकार प्रसंगी कडक भूमिकाही स्वीकारू शकते. त्याचे परिणाम सरकारच्या स्थैर्यावरही होऊ शकतात.
इथे आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा, नारायण राणेंनी महाडच्या पत्रपरिषदेत केलेले विधान प्रक्षोभक, बदनामीकारक किंवा जातीय तेढ, भडकावणारे होते काय? याचे उत्तर शोधल्यास नकारार्थीच मिळते. उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यदिनी भाषण करताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असा उल्लेख न करता हीरक महोत्सव असा उल्लेख केला. याबाबत विचारले असता, त्यावेळी मी समोर असतो तर उद्धव ठाकरेंच्या कानाखाली आवाज केला असता, असे विधान केल्याचे माध्यमांवर दाखवले आहे. यात काय प्रक्षोभक आहे? याचे उत्तर शिवसैनिकांनी द्यायला हवे. याच उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाषण करतांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चपलांनी मारण्याचे विधान केले होते, मग हे विधानही प्रक्षोभक नव्हते काय? या प्रकरणातही आता उद्धव ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा अशी भाजपची मागणी आहे.
या प्रकरणात आधी नमूद केल्याप्रमाणे, शरद पवारांनी गरज नसतांना तातडीने नारायण राणेंविरुद्ध कारवाई करण्याची परवानगी दिली. यात नारायण राणे तर हिरो बनले, आणि शिवसेनेविरोधात कुठेतरी सुप्त नाराजी निर्माण होण्यास मदत झाली आहे. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवार हे उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत, त्यामुळे त्यांना तोंडघशी पाडण्यासाठी ही पवारांची खेळी असल्याचेही राजकीय विश्लेषक बोलत आहेत. हे बघता उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने राणेंना पुढे केले आणि शरद पवारांनी राणेंना अटक करण्याची परवानगी दिली. या खेळीत उद्धव ठाकरे मात्र अलगद फसले आहेत.
हे सर्व बघता काल घडलेल्या नाट्यात नारायण राणे हिरो बनले ज्याचा फायदा भविष्यात भाजपला मिळणार आहे, शरद अपवरही खेळी खेळण्यात यशस्वी झाले आहेत. उद्धव ठाकरेंची अवस्था मात्र तेल गेले, तूप गेले, धुपाटणे आले हाती अशी झाल्याचे आजतरी दिसते आहे.

तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो….

ता.क. : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

अविनाश पाठक

Leave a Reply