सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु – आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : २४ ऑगस्ट – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा रद्द करण्याच्या राणेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यानंतर नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. यावर भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी भाष्य केलं आहे. ज्या प्रकारे सरकार वागत आहे अफगाणिस्तानमधले तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील एवढी झुंडशाही हे महाराष्ट्र विकास आघाडीचे लोकं करत आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो. राज्यसरकार आणि शिवसेनेला गर्भीत इशारा देऊ इच्छितो सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु. या प्रकरणामध्ये राज्यसरकार ज्या प्रकारे वागतंय अफगाणिस्तानमधले तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील एवढी झुंडशाही हे महाराष्ट्र विकास आघाडीचे लोकं करत आहेत. नारायण राणेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत नक्कीच संयम ठेवायला पाहिजे. त्यामुळे संयमाची अपेक्षा पक्षाने स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यानंतर सुद्धा झुंडशाही आम्ही राज्यामध्ये बघत आहोत. शिवसेनेने हा तमाशा बंद करावा. भाजपाचे कार्यालयाजवळ हे तमाशे चालू झाले तर भाजपा महाराष्ट्रभर तांडव करेल आणि त्याची जवाबदारी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीची राहिल,” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
ज्याप्रमाणे ही कारवाई झाली आणि मंत्री अनिल परब यांची एक क्लिप बाहेर आली त्यामुळे आता तालिबानींपेक्षा ही भयंकर तालिबानी हे लोकं आता जमलेले दिसत आहेत. नारायण राणेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. कोणाच्या म्हणण्यावरुन गुन्हे दाखल होणार असतील तर आता तुम्ही क्लिप दाखवताय तर आमच्याकडे सीडी आहे हे लक्षात ठेवा,” असे आशिष शेलार म्हणाले.

Leave a Reply