नाशिक : २४ ऑगस्ट – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. तसेच ठिकठिकाणी निदर्शने सुद्धा करण्यात येत आहेत. त्याच दरम्यान नाशकातील भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी नाशिकमधील भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली. तर राज्यभरातील विविध ठिकाणी आक्रमक झालेले शिवसैनिक नारायण रामेंच्या विरोधात निदर्शने करताना दिसत आहेत.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याचे सांगलीत पडसाद उमटले आहेत. सांगलीच्या विश्रामबाग येथील भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालय बाहेर नारायण राणे यांची मंत्री पदी निवड झालेल्या पोस्टरला शिवसेनेने काळे फासले आहे आणि निषेध व्यक्त केला आहे. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माहितीच्या आधारे मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं मला माहिती नाहीये. गुन्हा नसताना वॉरंट निघालं, अटक होणार चालू आहे. मी काय नॉर्मल माणूस वाटलो का तुम्हाला. नाशिक पोलिसांची इतकी तत्परता ही आदेशामुळे आहे. आमचं पण सरकार वर आहे ना? पाहूयात ना हे कुठपर्यंत उडी मारतात असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.