बस आणि ट्रकच्या अपघातात वृद्ध आजीचा जागीच मृत्यू तर १८ प्रवासी जखमी

बुलडाणा : २३ ऑगस्ट – यवतमाळच्या बस डेपोतून आज सकाळी औरंगाबादच्या दिशेला एसटी निघाली. एसटीत जवळपास २५ प्रवासी बसले होते. नुकताच काल रक्षाबंधन सण पार पडला. त्यामुळे पाहुणेमंडळी आपापल्या घरी जाण्यासाठी निघाली होती. पण अनपेक्षित अशी घटना घडली. यवतमाळमधून औरंगाबादला निघालेल्या बसचा बुलडाण्यात देऊळगाव राजा बायपास मार्गावर भीषण अपघात घडला. एका ट्रकने या बसला धडक दिली. त्यामुळे बसच्या काही भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात एका वृद्ध आजीचा जागीच मृत्यू झाला तर १८ प्रवासी जखमी झाले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बायपासवर एसटी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला. यामध्ये एक वृद्ध महिला जागीच ठार झाली. बसमधील १८ प्रवासी जखमी झाले आहेत. संबंधित घटना दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. ट्रक आणि बस यांच्या अपघाताचा आवाजही मोठा आला. हा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. तसेच महामार्गाने जाणारे अनेकजण घटनास्थळी थांबले.
स्थानिक नागरिकांनी तातडीने वेळेचा विलंब न करता पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तसेच नागरिकांनी बसमधील नागरिकांना बाहेर काढायला सुरुवात केली. यावेळी एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. नागरिकांनी सर्व जखमींना तातडीने देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. या दुर्घटनेत १८ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी ६ प्रवासी हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply