भाजप नेहमीच ओबीसी समाजासोबतच – उमा भारती

नागपूर : २३ ऑगस्ट – आरक्षणासाठी ओबीसींच्या सर्व जाती एकत्र येत या आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. ज्या प्रकारे कर्नाटकात लिंगायत समुदायाला आरक्षण मिळण्यासाठी सामाजिक ऐक्य दिसून आले. तसेच प्रयत्न इतर राज्यात केल्या जाऊ शकते, असे मत माजी केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले.
उमा भारती या नागपूर येथे आपल्या खासगी कामानिमित्ताने आल्या होत्या. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्यांचीही भेट घेतली. यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. पुढे त्यांनी सांगितले की, भाजप नेहमीच ओबीसी समाजासोबतच आहे. ओबीसींच्या विकासावर भाजपने नेहमी लक्ष दिले आहे. खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देखील अति मागास प्रवर्गातून येतात. त्या म्हणाल्या की, देशातील राजकारणात ओबीसींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाले. मंडल आयोगाच्या राजकारणापासून ते अयोध्या मंदिर निर्माण आंदोलनात कल्याणसिंग यांचे मोठे योगदान राहिले. अफगाणिस्तान तालिबानच्या कब्जावर त्या म्हणाल्या की, तालिबानचे कुणीच सर्मथन करू शकत नाही. तालिबानला पाकिस्तानची मदत मिळत राहिली आहे. कुठल्याही देशासाठी आणि समाजाकरिता तालिबानींसारखे विचार चांगले नाहीत. मध्य प्रदेशातील केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या यात्रेत घोड्यांना घेऊन झालेल्या वादावर त्या म्हणाल्या की, भाजप व भाजपचे नेते त्याबाबत जे सांगत आहे, त्याहून वेगळे आपण काही सांगणार नाही. परंतु राजकारण व सार्वजनिक कामात, यात्रांमध्ये सर्वांना हे लक्षात घेतले पाहिजे की कुठे आपल्याकडून संवैधानिक व नैतिक नियमांचे उल्लंघन तर होत नाही.

Leave a Reply