शिवसेनेची मानसिकता काय आहे हे मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वांना माहिती – संजय राऊत

मुंबई : २१ ऑगस्ट – ‘जेव्हा बाबरी पाडण्याचा प्रकार झाला तेव्हा सर्वजण पळून गेले होते. १९९२ साली मुंबईत बॉम्ब स्फोट झाला त्या दंगलीत देखील शिवसेना पुढे आली होती. तेव्हा हे कुठे गेले होते,’ असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मारकास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट देऊन वंदन केल्यानंतर काही तासांतच शिवसेनेतर्फे स्मारकाचे शुद्धीकरण करण्यात आले होते. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला होता. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यावर संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर केलं आहे.
‘शिवसेनेची मानसिकता काय आहे हे मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वांना माहिती आहे. शिवसेना एक प्रखर हिंदुत्वावादी पक्ष आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा शिवसेनेनं आणि शिवसेना प्रमुखांनी छातीचा कोट करुन त्या संकटाशी सामना केलाय. बाबरी कोसळत असताना ज्यांनी हात वर केले होते. मुंबईत जेव्हा दंगली उसळल्या होत्या. त्यात पाकिस्तानचा हात होता. तेव्हा शिवसेना प्रमुखाच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन त्या दंगेखोरांशी सामना केला होता. तेव्हा सगळे कड्या कुलूपं लावून आतमध्ये बसले होते आणि आज आम्हाला तालिबानी म्हणतायेत,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
‘मराठी माणूस व भूमिपत्रावर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा शिवसेना आजही त्यागासाठी बलिदानासाठी उभी असते. तेव्हा आम्हाला तुम्ही काही म्हटलं तरी आमचा आत्मा काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply