आता मराठा समाजाला आऱक्षण देण्याची जबाबदारी राज्याची – खा. संभाजीराजे

नांदेड : २० ऑगस्ट – केंद्र सरकारनं १२७ वी घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षणातील अडथळा दूर केला असून आता मराठा समाजाला आऱक्षण देण्याची जबाबदारी राज्याची असल्याचं भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. ते नांदेडमध्ये आयोजित मराठा आरक्षण मूक आंदोलनात बोलत होते. या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली.
नांदेडचे सुपुत्र दिल्लीत आले, सर्वांना भेटले. मात्र नांदेडमध्ये आलेल्या छत्रपती संभाजीराजेंना भेटायला त्यांना वेळ नव्हता, अशी टीका संभाजीराजेंनी केली आहे. सांगली कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय नेते या मोर्चासाठी हजर होते. मात्र नांदेडचे पालकमंत्री, जे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्षही आहेत, ते या कार्यक्रमाला का आले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. केंद्र सरकारनं १२७ वी घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षणाच्या मार्गातील प्रमुख अडसर दूर केल्यानंतर आता हे आरक्षण मिळवून देण्यासाठी कुणी पुढाकार घेतला पाहिजे, असा सवाल करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारकडे इशारा केला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आपल्याला संसदेत बोलू दिलं नसतं, तर आपण खासदारकी सोडली असती, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. शिवरायांच्या स्वराज्याचा मूलमंत्र होता. स्वराज्य केवळ मराठ्यांचे नाही, तर अठरापगड जातींचे होते, असं ते म्हणाले. छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ साली बहुजन समाजाला आरक्षण दिले. त्यात अठरापगड जातींचा समावेश होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करत महाराष्ट्रातील मराठा आरक्षणातील प्रमुख अडसर दूर केल्याचं त्यांनी सांगितलं.
सरकारने दिलेल्या पत्राच्या काही कॉपीज कार्यकर्त्यांनी फाडल्याचं सांगत या पत्रात अनेक त्रुटी असल्यामुळे आम्ही ते स्विकारत नसल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. आमची आंदोलन करण्याची इच्छा नाही, मात्र केंद्र आणि राज्य सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी, असं ते म्हणाले. ५८ आंदोलनांच्या माध्यमातून समाजाने भावना व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. रागयडला जाण्याची किंवा पुण्यामुंबईतून मोर्चे काढण्याची आमची इच्छा नाही, मात्र सरकारने समाजाला न्याय देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply