संपादकीय संवाद – स्वागत नव्या क्रांतिकारी भंगार धोरणाचे

भारतात प्रथमच भंगार वाहनांच्या विल्हेवाटीबाबत धोरण आखण्यात आले असून या धोरणामुळे देशात आर्थिक क्रांती घडणार आहे, असा दावा केंद्रीय भूपृष्ठपरिवण आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. अश्या वाहनांमुळे प्रचंड प्रदूषण वाढते आणि त्यामुळे पर्यावरणविषयक समस्या निर्माण होतात त्याचबरोबर अश्या जुन्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढते त्यामुळे हे धोरण राबवण्याचा सरकारने निर्णय घेतला असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
गडकरी यांनी जी माहिती दिली ती लक्षात घेता भंगार वाहनांमुळे देशात मोठी समस्या निर्माण होते हे निश्चित. त्यांच्या म्हणण्यानुसार १५ वर्षाची कालमर्यादा ओलांडलेला एक जुना ट्रक १५ नवीन ट्रक इतके प्रदूषण वाढवतो त्याचप्रमाणे एक जुनी कार ही १२ नवीन कार इतके प्रदूषण पसरवते. हे मुद्दे लक्षात घेतले तर देशातील भंगार वाहने रस्त्याबाहेर काढली तर प्रदूषणाची समस्या निश्चितच कमी होईल हे नक्की. त्याचबरोबर या भंगार वाहनाचे भाग वितळवून लोखंड, प्लास्टिक, रबर, ऍल्युमिनिअम हे रिसायकल केले जाईल आणि त्यातून नवी वाहने तयार होतील. सध्या नव्या वाहनांसाठी हे सर्व जिन्नस परदेशातून बोलवावे लागतात. परिणामी मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होते. हे सर्व रिसायकल केलेले जिन्नस वापरले तर परकीय चलनाचा भार कमी होईल आणि परिणामी नव्या वाहनांची किंमतही कमी होणार आहे.
सध्या देशात मोठ्या संख्येत ट्रक, कार, तीनचाकी ऑटोरिक्षा आणि दुचाकी वाहने रस्त्यावर आहेत. एकदा खरेदी केलेले वाहन लोक वर्षानुवर्षे वापरतात. १० वर्ष वाहन चालले की पुन्हा एकदा घासलेले भाग बदलून वाहनाला नव्याने रस्त्यावर आणतात, मात्र त्यामुळे होणारे प्रदूषण कुणीच लक्षात घेत नाही. तीनचाकी ऑटोरिक्षा चालवणारे तर चक्क पेट्रोलमध्ये रॉकेल मिसळून चालवतात यामुळे प्रदूषणाची समस्या प्रचंड वाढते. गडकरींच्या या नव्या धोरणामुळे प्रदूषणाची समस्या निश्चित कमी होईल. दर १५ वर्षांनी नवी वाहने घ्यायची असल्यामुळे वाहननिर्मिती आणि विक्री व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढेल. जुन्या भंगार वाहनांचा रिसायकल केलेला कच्चा माल वापरात आणल्यामुळे वाहनांच्या किमतीही कमी होतील. आणि या सर्व प्रकारात देशाला कराच्या माध्यमातून नवा लाभही होणार आहे. वाहनांच्या या विक्रीतून देशाला दरवर्षी ८० हजार कोटींचा जीएसटी मिळेल असा दावा गडकरींनी केला आहे.
हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर येत्या ५ वर्षात आपला देश जगातील सर्वात मोठे मॅन्युफॅक्चरिंग हब बनणार आहे त्यामुळे या निर्णयाचे स्वागत तर करायलाच हवे. मात्र एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा, आज अजूनही मध्यमवर्गीय कुटुंबात माणूस एकदाच वाहन खरेदी करतो त्याला दार १५ वर्षांनी नवे वाहन खरेदी करणे सद्यस्थितीत परवडणारे नाही, त्यामुळे नव्या भंगार धोरणाचे स्वागत करतांना मध्यमवर्गीयांना सहज खरेदी करता येतील अश्या भावात वाहने उपलब्ध करून द्यायला हवी.
एकूणच नितीन गडकरींचा कल्पक स्वभाव बघता त्यांनी या बाबतीतही काहीतरी नियोजन केले असणार असा विश्वास जनसामान्यांना आहे. हा विश्वास गडकरी सार्थ ठरवतील हीच सर्वांना अपेक्षा आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply