देशातील प्रतिभा देशातच राहू द्या – महापौर दयाशंकर तिवारी

नागपूर : १६ ऑगस्ट – भारतात गुणवंतांची आणि प्रतिभावंतांची काहीही कमी नाही. मात्र इथे घडवले गेलेले गुणवंत परदेशात जाऊन आपल्या ज्ञानाचा फायदा दुसऱ्या देशांना देतात, आपल्याला देशाला जागतिक महासत्ता बनवायचे असेल तर आपल्या देशातील प्रतिभा आपल्या देशातच राहतील आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रयत्न करूया असे आवाहन नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी. यांनी केले .
भारत विकास परिषदेच्या नागपुरातील सर्व शाखांच्या वतीने १४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११.४५ वाजता शहीद स्मारकाजवळ एकत्र येऊन अमृत महोत्सवी वर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल विपीन वैद्य हे होते. भारत विकास परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष चंद्रशेखर घुशे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना महापौर म्हणाले की आपल्या प्रतिभांचा उपयोग आधी आपल्याकडे व्हायला हवा, मात्र प्रतिभावान लोक बाहेर का जातात? याचा विचार करणे गरजेचे आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक वीरांनी प्राणाच्या आहुती दिल्या त्यांचे स्मरण करणे गरजेचे आहे त्याचबरोबर स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाचे रक्षण करण्यासाठी ज्या जवानांनी प्राणाची आहुती दिली त्यांचे स्मरण करणेही गरजेचे आहे असे ते म्हणाले.
यावेळी बोलतांना कर्नल विपीन वैद्य यांनी शहीद सैनिकांचे उचित स्मारक नागपुरात व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर घुशे यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांनी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केल्यावर ७५ दिव्यांचे प्रज्वलन करून अमृत महोत्सवी वर्षाचे स्वागत केले. यावेळी उपस्थितांनी भारत मातेचा जयजयकार करीत जल्लोष साजरा केला. कार्यक्रमाचे संचालन विदर्भ प्रांत सचिव सीमा मुन्शी यांनी केले. यावेळी संजय गुळकरी, दिलीप गुळकरी, पद्माकर धानोरकर, सारिका पेंडसे, अविनाश पाठक यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Leave a Reply