विरोधकांचा माझा राजकीय प्रवास संपवण्याचा प्रयत्न – महिलेच्या तक्रारींवर संजय राठोड यांचा खुलासा

यवतमाळ : १३ ऑगस्ट – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना नेते संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. संजय राठोड यांच्याविरोधात एका महिलेने यवतमाळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली असल्याची लेखी तक्रार महिलेने केली आहे. दरम्यान संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या आरोपांना उत्तर दिलं आहे.
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत संजय राठोड यांच्यावर महिलेने केलेल्या आरोपाची माहिती दिली आहे. शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखित सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत लैंगिक छळ करतो, असं त्यात म्हटले आहे अशी माहिती चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये दिली आहे. यासोबत चित्रा वाघ यांनी यावेळी तक्रारीच्या पत्राचे दोन फोटोही पोस्ट केले आहेत.
दरम्यान संजय राठोड यांनी माझा राजकीय प्रवास संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. संजय नावाच्या साधर्म्यामुळे घोळ झाला असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.
“मी एका संस्थेचा पदाधिकारी होतो. त्या संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत तीन कर्मचाऱ्यांवर सातत्याने गैरहजर असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. जे बडतर्फ झाले त्या कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या. संस्थेच्या बाजूने निकाल लागला असून प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे. मग अशावेळी मुलांचं भवितव्य लक्षात घेऊन संस्थेने शासनाकडे परवानगी मागितली आणि दोन शिक्षकं, स्वयंपाकी यांना घेतलं. या जागा भरल्यानंतर तात्पुरती नियुक्ती मिळाली. यावेळी एका शिक्षकाचं प्रकरण समोर आलं. तात्पुरती नियुक्ती असल्याने त्या शिक्षकाने २०१७ मध्ये स्वत:हून राजीनामा दिला. मधल्या काळात शिक्षक आणि नातेवाईक पुन्हा आले आणि घेण्याची विनंती केली. यादरम्यान मी संस्थेचा राजीनामा दिला. त्यानंतर माझे सहकारी म्हणून काम करणाऱ्या शिक्षकाला माझा क्रमांक समजून मेसेज आले. त्यांचंही नाव संजयच आहे. यानंतर त्या शिक्षकाने २४ मे २०२१ रोजी तक्रार केली,” अशी माहिती संजय राठोड यांनी दिली आहे.
नंतर त्या प्रकरणाचा आधार घेऊन माझ्यावर आरोप करण्यात आले असा दावा करताना मीदेखील वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याची माहिती त्यांनी दिली. नैराश्याच्या मानसिकतेतून तक्रार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. राजकीय विरोधक राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीचे फंडे वापरत असतात. मागील वेळी झालेल्या आरोपांचा आधार घेऊन आरोप होत आहेत असंही यावेळी ते म्हणाले.

Leave a Reply