संसदेत महिला सदस्यांचा अपमान करण्यात आला, ही घटना अशोभनीय – नवाब मलिक

मुंबई : १२ ऑगस्ट – संसदेत महिला सदस्यांना पुरुष मार्शलकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यावर राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत केंद्राला विचारणा करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संसदेत महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने धक्काबुक्की केली. बळाचा वापर करण्यात आला. ही घटना अशोभनीय आहे, असं मलिक म्हणाले. महिला सदस्यांचा अपमान करण्यात आला. लोकशाहीत अशाप्रकारची घटना योग्य नाही. यावर लोकसभा अध्यक्ष व राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. परंतु त्यांनी सरळ- सरळ केंद्रसरकारला याप्रकरणी विचारणा करण्याची गरज होती. मात्र त्यांनी राजकीय दबावामुळे तसे केले नसावे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.
संसदेचे कामकाज दोन दिवसाअगोदर स्थगित करण्यात आले. याचा अर्थ केंद्रसरकार जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत होते. पेगासस प्रकरण, शेतीचा कायदा असेल, जातनिहाय जनगणना असेल या सर्व प्रश्नांवर चर्चा न करता किंवा त्याचे उत्तर न देता संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचा अर्थ संसदेत कोणतेच उत्तर द्यायचे नाही असे धोरण सरकारचे होते, असा दावाही त्यांनी केला.

Leave a Reply