याचे पर्यवसान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात होऊ शकते

संपादकीय संवाद

Avinash Pathakरेमेडिसिवीरचे उत्पादन करणाऱ्या ब्रूक्स फार्मा या कंपनीच्या मालकाला अटक करून बीकेसी वांद्रा पोलीस ठाण्यात आणणे आणि विरोधी पक्षाचे नेते पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते अशी सारवासारव करत सोडून देणे हा प्रकार महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारच्या राजकारणाची पातळी किती खालच्या पातळीवर घसरली आहे याचे द्योतकंच म्हणता येईल. विशेष म्हणजे राज्यमंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या विशेष कार्य अधिकाऱ्याने केलेल्या फोनमुळे पोलिसांनी हा प्रकार घडवून आणला असेल तर हे प्रकरण फारच गंभीर ठरते.
राज्यात रेमेडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला, हे वास्तव नाकारता येणार नाही मात्र या मुद्द्यावर राजकारण करायचे आणि विरोधकांना अकारण लक्ष्य करायचे हा प्रकार कितपत योग्य म्हणता येईल नागपूर शहरात रेमेडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होतो आहे हे लक्षात येताच नागपूरचे खासदार असलेल्या नितीन गडकरींनी या औषधाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांना फोन केले आणि नागपुरात ताबडतोब रेमेडिसिवीर पोहोचेल अशी व्यवस्था केली त्या पाठोपाठ विदर्भातीलही सर्व जिल्ह्यात हे इंजेक्शन कसे पोहोचेल हे गडकरींनी बघितले आहे. विदर्भाची सोय झाली की उर्वरित महाराष्ट्रातही आपण रेमेडिसिवीरची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करू असेही गडकरी बोलले आहेत. याच पद्धतीने महाराष्ट्रात तुटवडा आहे हे बघून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे ब्रूक्स फार्माच्या मालकांशी बोलले आणि त्यांनी ५० हजार इंजीक्शन्स पाठवण्याचा शब्दही दिला होता.
याच वेळी महाआघाडी सरकारमधील एक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बोलघेवडे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रेमेडिसिवीर विकणाऱ्या कारखानदारांवर धाडी टाकून माल जप्त करण्याची धमकी दिली हा प्रकार म्हणजे सरळ सरळ केंद्र सरकारशी पंगा घेण्याचाच प्रयत्न होता. मात्र महाआघाडीच्या नेत्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नव्हते ते फक्त धमकी देऊनच थांबले नाहीत तर कृतीही सुरु केली सरळ ब्रूक्स फार्माच्या मालकांना घरून उचलून पोलीस ठाण्यातच आणून बसवले .
या प्रकारात खरी पोटदुखी वेगळीच होती आम्ही रेमेडिसिवीर संपले म्हणून केंद्रावर टीका करतो आहेत आणि विरोधी पक्ष राज्यात आपला शब्द खर्चून रेमेडिसिवीरची सोय करताहेत याचे सर्व श्रेय भाजपाला मिळेल आणि आपण फक्त बोघेवडेच ठरू या भीतीपोटी या मंत्र्याने आपल्या ओएसडी मार्फत पोलिसांना फोन करवला आणि रातोरात सदर उद्योगपतीला अटक करून पोलीस ठाण्यात आणले.
हा प्रकार कळल्यावर विरोधी पक्षनेते फडणवीस आणि दरेकर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले जर पोलिसांची कृती वैध असती तर त्यांनी या उद्योगपतींना सोडून देण्याचे काहीच कारण नव्हते मात्र, चुकीच्या माहितीच्या आधारे केलेली कारवाई असल्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी रुद्रावतार धारण करत कायदेशीर मुद्द्यांवर बोट ठेवल्याबरोबर पोलिसांना लगेच कथित आरोपीला सोडून द्यावे लागले यातच महाआघाडीने केलेले सुडाचे राजकारण स्पष्ट दिसून येते.
या प्रकारानंतर सदर उद्योगपती गुजराथी असल्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी त्याला सोडवण्यासाठी धाव घेतली असा प्रचार समाजमाध्यमांद्वारे केला जातो आहे मात्र, महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे याची जाणीव महाआघाडीतील नेत्यांनी ठेवायला हवी. विरोधकांशी सूडबुद्धीने वागायचे आणि विरोध करण्यासाठी म्हणून केंद्राशीही अकारण पंगा घ्यायचा याचे भविष्यातील परिणाम गंभीर असू शकतात.
शिशुपालाचे शंभर अपराध होताच श्रीकृष्णाने त्याचा वध केला होता, इथे महाआघाडीच्याही अपराधांचा घडा हळूहळू भरत जातो आहे आधी राज्यपालांना विमानातून उतरवले, आता केंद्राशी पंगा घेण्याची तयारी सुरु केली आहे, याचे पर्यवसान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात होऊ शकते याची जाणीव ठेवायला हवी.

अविनाश पाठक

Leave a Reply