विदर्भाची कोरोनमुक्तीकडे वाटचाल, गेल्या ४ दिवसात एकही मृत्यू नाही

नागपूर : ११ ऑगस्ट – करोनाच्या दोन्ही लाटेचा सर्वाधिक फटका बसला तो महाराष्ट्राला. गेल्या दोन महिन्यांपासून राज्याची रुग्णसंख्या बरीच कमी झाली आहे. त्यातच अजून एक आनंदाची बातमी. ती म्हणजे विदर्भात गेल्या चार दिवसांत एकही मृत्यूची नोंद नसून तब्बल ६ जिल्ह्यांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. विदर्भात गेल्या २४ तासांत १४ हजार करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी केवळ ३४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. विदर्भाचा पॉझिटीव्हीटी रेट ०.३० टक्क्यांवर गेला असून रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यात सध्या सर्वाधिक ७० टक्के बाधित पश्चिम महाराष्ट्रात आढळत आहेत. तर राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये १० पेक्षा कमी रुग्णांची नोंद आहे. भंडारा, वर्धा, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नसून यवतमाळ, अकोला, नागपूर, चंद्रपूरमध्ये दहापेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. फक्त अमरावतीत १० बाधितांची नोंद करण्यात आलीए. याशिवाय विदर्भातील काही जिल्ह्यांसह धुळे आणि नंदुरबार हे जिल्हेही लवकरच करोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच करोना नियमांचे पालन करून आठवडी बाजार भरवण्यात येत आहेत.
राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केलाय. राज्यात रुग्णसंख्येत चढउतार सुरूच आहे. त्यामुळे जोपर्यंत मुलांचं लसीकरण होत नाही तोपर्यंत शाळा सुरू केल्या जाऊ नयेत, असं आयएमएचे प्रवक्ते अविनाश भोंडवे यांनी म्हटलंय.

Leave a Reply