बेंगळुरूत गेल्या ५ दिवसात २४२ लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग

बेंगळुरू : ११ ऑगस्ट – करोना संसर्गाबाबत धोक्याची घंटा आहे. खासकरून लहान मुलांना संसर्गाचा धोका वाढला आहे. बेंगळुरूमध्ये गेल्या ५ दिवसांत २४२ लहान मुलं करोना पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. ही संख्या येत्या दिवसांमध्ये आणखी वाढेल, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका आहे, असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला होता. मुलांना होणाऱ्या संसर्गावरून हा इशारा खरा तर ठरणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतोय.
बेंगळुरू शहरात १९ वर्षांखालील २४२ मुलांना गेल्या ५ दिवसांत करोनाचा संसर्ग झाल्याचं बेंगळुरू महापालिका प्रशासनाने म्हटलं आहे. करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या २४२ मुलांपैकी १०६ मुलंही ९ वर्षांहून कमी वयाची आहेत. १३६ मुलं ही ९ ते १९ वर्षांदरम्यानची आहेत. ही सर्व मुलं गेल्या ५ दिवसांत पॉझिटिव्ह आढळली आहेत.
प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमधील प्रतिकारक्षमता ही कमी असते. यामुळे मुलांना घरातच ठेवा. बाहेर जाऊ देऊ नका. करोनासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, असं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. लहान मुलांना संसर्गाचा मोठा धोका आहे. यामुळे येत्या दिवसांमध्ये करोना पॉझिटिव्ह मुलांची संख्या तीन पटीने वाढण्याचा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply