सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

मराठी पाऊल पडते पुढे

“इंटरनॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी” पुणे येथे आॅक्टोबर २०२२ पर्यंत सुरू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. मविआ सरकार बद्दलपहिल्यांदा काहीतरी चांगले लिहिण्याचा योग आला. आॅलिम्पिक २०२१ महाराष्ट्राचा एकसुद्धा खेळाडू नाही. तर पदक मालिकेमध्ये तर नाव येण्याचा प्रश्नच् नाही. भारतासाठी हरियाणा सरकारने पदकधारी खेळाडुंवर करोडो रुपयांचा वर्षाव केला तर महाराष्ट्र सरकारने एक ही खेळाडू पाठविता आला नाही, ह्याचे प्रायश्चित्त म्हणा किंवा कसौटीवर उतरण्याची तयारी म्हणा…..जर ही युनिव्हर्सिटी ख-या अर्थाने भ्रष्टाचार मुक्त, क्रीडा भावनेने ओतप्रोत असेल तर महाराष्ट्र सरकार ख-या अर्थाने उच्च प्रतीचे खेळाडू देण्यात यशस्वी ठरेल, असे म्हणणे सार्थ ठरेल.
९.३६% भारताचा भूभाग व्याप्त आणि ८.४५% (११.४२ करोड) जनसंख्या असणा-या, भारताच्या आर्थिक राजधानी असणा-या महाराष्ट्र राज्याने २०२१ आॅलिम्पिक स्पर्धेत ०% (शुन्य टक्के) सहभाग उचलला आणि इंटरनॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी उघडुन आगामी भविष्यासाठी आॅलिम्पिक खेळाडूंचा एक जत्था, पदक तालिकेत आणि बक्षीस पात्र रोकड देण्यात महाराष्ट्र राज्य अग्र स्थानावर राहिल, आगामी ८-१० वर्षात अशी आशा करुया.
३४ हजार लोकसंख्येच्या”सॅन मारिनो” देशाने तीन पदकं आणली. निकषावर पदकांसाठी “कठोर मेहनत आणि अभेद्य लक्ष्य” हीच् यशाची गुरुकिल्ली म्हणता येईल. लोकसंख्या जास्त – म्हणून पदक जास्ती असे त्रैराशिक काम करु शकणारे नाही.
महाराष्ट्राने आजवर अनेक नावाजलेले आंतरराष्ट्रीय किर्ती चे खेळाडू जगाला दिले आहेत. त्यात मुख्यत्वे क्रिकेट क्षेत्रात हा सहभाग खुप मोठा आहे. एके काळी तर ११ जणांच्या कसोटी सामन्यात पाच खेळाडू एकट्या महाराष्ट्राचे किंबहुना मुंबईचे असत. मात्र महाराष्ट्र क्रिडा क्षेत्रात क्रिकेट पर्यंत सिमीत होता आणि “इंटरनॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी” च्या नावाने रणशिंग फुंकुन महाराष्ट्र सरकारने जागतिक क्रमवारीत आपल्या खेळाडूंना उच्च स्थान देण्यास, आपले मनोरथ जाहीर केले आहे असे म्हणायला हरकत नाही. किंबहुना ही नुसती “बोलाचा भात आणि बोलाचीच कढी” नसुन त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारची पाऊले कार्यरत आहे ही अतिशय आनंदाची बाब आणि महाराष्ट्र जनांसाठी अभिमानाची बाब आहे.
३५ करोड लोकसंख्येचा देश अमेरिका – ११३ मेडल्स सगळ्यात जास्ती ३९ सुवर्ण पदके.
१४० करोड लोकसंख्येचा चा देश चीन – ८८ पदके – ३८ सुवर्ण पदके
१२.६० करोड लोकसंख्येचा देश जपान – ५८ पदके – २७ सुवर्ण पदके
३३,८६० (तेहतीस हजार, आठशे साठ फक्त) – लोकसंख्येचा इटुकला देश सॅन मारिनो – ३ पदके – १ रौप्य, २ कांस्य
आपल्याएवढा लोकसंख्येला मिळताजुळता देश म्हणजे चीन. १९८८ मध्ये केवळ पाच सुवर्ण पदकांवर समाधान मानावे लागणा-या चीन ने आॅलिम्पिक पथकांमध्ये जी मुसंडी मारलेली तो आजतागायत तो दबदबा कायम आहे. काय “दे गा हरी खाटल्यावरी” पदक मिळाली? १९८८ नंतर चीन ने आपल्या देशात क्रिडा आणि खेळाडूंसाठी प्रणाली विकसित केली. त्या काळी जवळपास २५० मिलीयन अमेरिकन डॉलर चे वर पैसा ओतला, विदेशी कोच प्रशिक्षणासाठी बोलावले आणि जागो-जागी शाळाशाळातून खेळाडू निवडणे – विकसित करणे आणि वर्षानू वर्षे प्रयत्नांती खेळात विशारद करून, त्याच्यामार्फत देशाला पदकं मिळवून देणे. संपली वाचकहो – दोन ओळी, तीन वाक्य आणि देशाला पदकांची रीघ लागण्याचा खेळ सुरू. नाही !!!!!!!! इतके सोप्पे निश्चितच नाही.
आज चीन चे सरकार चे खेळांचे बजेट ३ लाख कोटी रुपयांचे आहे तर तुलनेत भारताचे बजेट २५९६.१४ करोड रुपये. “जैसी करनी वैसी भरनी” चीन जवळ आज ८८ पदके आहे तर भारतापाशी केवळ ७ पदकं. अमेरिकेत क्रीडा क्षेत्रात पैशाचा अपव्यय किंवा भ्रष्टाचाराची उदाहरणे आहेत मात्र अशी उदाहरणे चीन मध्ये वानगीदाखल सुद्धा दिसत नाही.
निव्वळ चार वर्षांचे अथक परिश्रम आणि १९९२ मध्ये चीन ने स्थान पदक तालिकेत चौथ्या नंबरवर पक्के केले. केवळ चार वर्षात फक्त पाच पदकांवरून जगातील चौथे स्थान. जगाला चकित करणारी चार वर्षे. काय केले असेल चीन्यांनी?? १५० स्पोर्ट्स कॅम्प, सगळे हजारो छोटे छोटे कॅम्प्स. जवळपास ३००० चे आसपास स्पोर्ट्स शाळा. शास्त्रोक्त क्रिडा शिक्षण देण्यासाठी हजारो छोट्या मोठ्या योजना.
चीन पुढे आव्हान होते ते चांगले खेळाडू मिळवण्याचे. त्यासाठी त्यांना प्रत्येक खेळाचा सखोल अभ्यास करून त्याप्रमाणे खेळानुरूप अंगकाठीची मुले मुलींचा क्रिडा क्षेत्रात खेळण्याचा मानस तयार करण्यात आला आणि त्यानंतर अथक परिश्रम करीत त्यांच्यातील क्रिडा नैपुण्याला दिशा देण्याचे कौशल्य, चीन ला जगात श्रेष्ठ स्थान मिळवून देण्यात यशस्वी झाले.
जसे अपवादात्मक लवचिकता असणा-यांना जिमनॅस्टिक- डायविंग साठी, उंच मुले बास्केटबॉल-व्हॉलीबॉल, ज्यांची प्रतिक्षेप ( Reflexes) चांगले आहेत त्यांना टेबल टेनिस सारख्या खेळांसाठी घेतले जाते. ज्यांचे हात लांब आहेत अशांना पोहणे-भालाफेक, ज्यांचा पाठीचा कणा मजबूत आहे – एकाग्रता चांगली आहे अशांना धनुर्विद्या. अशा प्रत्येक खेळाचे निकष ठरवून खेळाडू निवडले जातात आणि मग प्रशिक्षण सुरू केले जाते.
लियू हुआना – चीन ची फुटबॉल महिला खेळाडू च्या भाषेत सांगायचे तर वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंत तिला फुटबॉल हा खेळ माहिती सुद्धा नव्हता. स्थानिक लोक नवीन खेळाडू निवडण्यासाठी शाळेत आले. वर्गातील सगळ्यात “वेगवान धावपटू” ह्या निकषावर मला निवडले गेले. लियू हुआना ने नंतर आॅलिम्पिक मध्ये आपले स्थान पक्के केले. असे छोटे छोटे कितीतरी उदाहरणे देता येतील. ज्यांनी चीनचा इतिहास घडविला.
आपल्या इथे जसा शाळेला – अभ्यासाला पहिला मान तसा तिथे निवडलेल्या खेळाडुंचा पहिला मान म्हणजे सुवर्ण पदक प्राप्त होत नाही तोवर अहर्निश खेळात प्राविण्य मिळविण्याची धडपड. आणि सुवर्ण पदक मिळविण्यासाठी अहर्निश झटणारे “निस्वार्थी” प्रशिक्षक आणि वेळोवेळी मार्गदर्शन पर लागणारी खेळसामुग्री वेळेत हजर करणारा राष्ट्रभक्तीने ओतप्रोत आर्थिक व्यवस्थापन संघ.
सचिन तेंडुलकर आठवतो ! कसे विसरणार? त्याच्या विजयी संघर्षाचं क्रिकेटीय गणित काय होते? सातवी पास त्यानंतर शाळा सोडून दररोज ८-१० तास मैदानावर सराव. सचिनचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर, त्याच्या स्टंपवर एक रुपयाचे नाणे ठेवत आणि दिवसभ-यात जर तो क्लिन बोल्ड नाही झाला तर ते नाणे सचिन ला मिळत असे. सचिन म्हणतो ते जमा केलेले असंख्य नाण्याची पोतडी, आजसुद्धा जीवापाड जपुन ठेवली आहे त्याने. आठवते सचिन क्लिन बोल्ड होत नसे. झाला तो अगदी क्रिकेट जीवनाच्या शेवटच्या काळात.
आंद्रे आगासी म्हणतो तो त्याच्या वडिलांच्या आग्रहास्तव “टेनिस” जगतात आला. त्याच्या वडिलांचे म्हणणे “इमॅन्युएल आगासी” चे म्हणणे होते की कोणत्याही खेळाची जर १०००० दहा हजार तास सराव केला तर कोणत्याही खेळात नैपुण्य प्राप्त करता येते. आणि त्याच धरतीवर त्यांनी आपल्या मुलाला “जगद्विख्यात” उंचीवर नेऊन बसवले.
आम्ही सुद्धा महाराष्ट्राला अशाच् उंचीवर बघण्यासाठी आसुसलो आहोत. नेमबाजी, भालाफेक, थाळी फेक, गोळाफेक तिरंदाजी, दौड, घोडदौड हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील मावळांच्या DNA मध्ये उतरलेले, जन्मजात रगारगात भिनलेले खेळ. महाराष्ट्राने सुद्धा जर भ्रष्टाचार रहित, निस्वार्थी बुध्दीने केवळ देशहितासाठी, योग्य निकषावर योग्य खेळाडुंना अविश्रांत प्रयत्नांच्या पराकाष्ठेची जोड दिली तर, आशा आहे आज जे सात पदकं भारताला मिळाली तेवढी पदकं एकटा महाराष्ट्र आणु शकतो. आणि हरियाणा मुख्यमंत्री खट्टरचे दात खट्टे करु शकतो.
“सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे।परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे ।।” सोप्या शब्दात समर्थ रामदास स्वामींनी यशाचे गमक सांगितले आहे की अरे, खेळाडुंनी आपापल्या खेळाला देव मानले, त्याचे अजरामर अधिष्ठान डोक्यात घट्ट बसवले आणि “सामर्थ्य आहे चळवळीचे” म्हणजे खेळात पारंगत होण्यासाठी अहोरात्र, अथक प्रयास “जो जो करील तयाचे” तर पदक तालिकेत आम्ही अग्रेसर होवु ह्यात शंका नाही. पण फक्त खेळाडू ना ज्ञान पाजण्यात अर्थ नाही. निरपेक्ष जिद्दीने प्रेरित प्रशिक्षक, पारदर्शी – भ्रष्टाचार शुन्य व्यवस्थापन आणि संपूर्ण देखरेखीखाली जर “इंटरनॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी” चे संगोपन करण्यात आले तर …
भारतच् नव्हे तर जग सुद्धा “राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा” तुला “सलाम” म्हणेल. त्यावेळी आपसुक आमचा हात सॅल्युट करीत टीव्ही वरील आमच्या राष्ट्रगानाला उभे राहु. आमचा ऊर अभिमानाने भरून येईल कारण आमच्या “इंटरनॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी” चे मराठी छोरे छोरी “गोल्ड मेडल” गळ्यात घालण्यासाठी आपली मान झुकवून – देशाचा मान उंचावत असतील.
भारssत माता की जय

भाई देवघरे

Leave a Reply