हिमाचलमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसवर कोसळली दरड, ४० जण ढीगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

नवी दिल्ली : ११ ऑगस्ट – हिमाचल प्रदेशमधील किन्नूरमध्ये एका प्रवासी बसवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांनी भरलेल्या बसवर ही दरड कोसळली आहे. तसेच या दरडीमध्ये इतर अन्य वाहनेही अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमध्ये किमान ४० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता पोलीस उपायुक्त होसेन सिद्दकी यांनी व्यक्त केलीय.
चौरा आणि किन्नूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हा अफघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये एक डोंगर कडाच तुटून बसवर पडल्याने संपूर्ण बस या ढीगाऱ्याखाली सापडलीय. ही बस किन्नूरमधून हरिद्वारकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग पाचवर झालेली ही दुर्घटना छील जंगलाच्या परिसरात घडली आहे. या दुर्घटनेमुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे.
या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. बसच्या चालकाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं असलं तरी या ढिगाऱ्याखाली अनेक प्रवाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या दरडीखाली बस बरोबर काही खासगी वाहनेही गाडली गेल्याची शक्यता आहे. खासगी वाहनांमधील काही लोक मदतीसाठी ओरडत होते असं स्थानिकांनी म्हटलं आहे.
माहितीनुसार रेकाँग पिओ- शिमला मार्गावर हा अपघात झालाय. एक ट्रक आणि हिमाचल प्रदेश राज्य परिवहन मंडळाची एक बस या दरडीखाली सापडली आहे. या ढीगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी मदतीसाठी इंडो तिबेटीयन सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) तुकडीला बोलवण्यात आलं असून मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. याबद्दलची माहिती आयटीबीपीनेच दिली आहे.
हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही यासंदर्भातील माहिती दिली आहे. “मी पोलीस आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना बचाव कार्यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. एनडीआरएफच्या तुकड्यांनाही माहिती देण्यात आली आहे. आम्हाला मिळेलेल्या माहितीनुसार एख बस आणि एक गाडी या खाली अडकली आहे. आम्ही सविस्तर माहितीची वाट पाहत आहोत,” असं ठाकूर म्हणालेत.
या ठिकाणी पुन्हा दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्याने मदतकार्यामध्ये अडथळे येत आहेत.

Leave a Reply