जम्मू काश्मीरला पूर्वीप्रमाणे राज्याचा दर्जा परत द्यायला हवा – राहुल गांधी यांची मागणी

श्रीनगर : १० ऑगस्ट – जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी श्रीनगरमधील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. या दौऱ्यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. यानंतर पक्ष कार्यकर्त्यांशी बोलताना काँग्रेसचे खासदार म्हणाले, की जम्मू काश्मीरला पूर्वीप्रमाणे राज्याचा दर्जा परत द्यायला हवा. जम्मू आणि काश्मीरमध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होण्याची गरज आहे.
राहुल गांधी म्हणाले, की संसदेमध्ये बोलू दिले जात नाही. आमच्यावर दबाव टाकला जातो. संसदेमध्ये पेगासस, राफेल, जम्मू-काश्मीर, बेरोजगारी याबद्दल बोलू शकत नाही. हे लोक हिंदुस्थानमधील सर्व संस्थांवर हल्ला करत आहेत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे जम्मू आणि काश्मीरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी सकाळी गांदरबल येथे खीर भवानी मंदिरात पूजा-अर्जना केली होती. श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी हे सायंकाळी जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाले.
काँग्रेसचे वरिष्ठ नेता गुलाम नबी आझाद म्हणाले, की निवडणुका लवकर होणे आवश्यक आहे. त्यापूर्वी राज्याचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. काश्मीर पंडितांना वापस आणणे आवश्यक आहे. नवीन कायद्यानुसार राज्याचा दर्जा मिळाल्यास जमीन आणि नोकरी ही पहिल्याप्रमाणे मिळणे आवश्यक आहे.
जम्मू काश्मीरला कलम ३७० नुसार सार्वभौम राज्य म्हणून विशेष दर्जा देण्यात आला होता. केंद्र सरकारने 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरचे कलम ३७० रद्द केले आहे.

Leave a Reply