वाहनदुरुस्ती करणाऱ्या दुकानांना लागली आग

नागपूर : ६ ऑगस्ट – रामदासपेठेतील काचीपुरा परिसरात वाहनांची दुरुस्ती करणाऱ्या दुकानाना पहाटे आग लागल्याने सहा दुकानातील साहित्य जळून खाक झाले. या आगीत सहा वाहने जळाली असून कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. या दुकानांच्या मागे आणि बाजूला झोपडपट्टी आहे. मात्र अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
काचीपुरा परिसरातील पोलीस ठाण्याच्या शेजारी वाहन दुरुस्ती करणारी सात ते आठ दुकाने आहेत. रात्री दीडच्या सुमारास एका दुकानाला आग लागली आणि काही वेळातच चार ते पाच दुकाने आणि एक खाजगी कार्यालय आगीच्या विळख्यात आले. दुकानाच्या पाठीमागे असलेल्या एका नागरिकाला आगीचे लोळ दिसताच त्यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या सहा वाहनांनी दीड ते दोन तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत राठोडे ऑटोमोबाईल. न्यू नागपूर गॅरेज, जनता गॅरेज, हेमंत कुशन वर्कर्स, गुलजार ऑटो, व्यास ऑटो इलेक्ट्रिक, युवराज कुशन, जितेंद्र राठोड यांचे कार्यालय, अक्षयलाल पांडे यांचे निवासस्थान या जळाले. आग कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासणीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले.
ज्या सहा दुकानांना आग लागली त्यातील एकाही दुकानात अग्निशमन यंत्रणा नव्हती. गाडय़ांना लागणारे सामान, कुशन कव्हर,स्पंज आदी साहित्य होते. शिवाय सहा दुकानापैकी ४ दुकानांनी अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. तपासणीत कुठेही आग विझवण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे महापालिका आता त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे.

Leave a Reply