शरद पवार आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार

नवी दिल्ली : ३ ऑगस्ट- पंधरा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दिल्लीत ही भेट होत असून, या भेटीबद्दल आता तर्कवितर्क लावले जात आहेत. मोदी सरकारने मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी महत्त्वाचा निर्णय घेत स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आलेली असून, सहकार खात्याशी संबंधित कामासंदर्भात पवार शहा यांना भेटणार असल्याचं वृत्त आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी १७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. सहकार आणि राज्यातील काही प्रश्नांसंदर्भात ही भेट घेतल्याचं सांगण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर शरद पवार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. सहकार मंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर पवार आणि शहा यांची ही पहिलीच भेट आहे. सहकार क्षेत्राशी संबंधित प्रश्नाबद्दल पवार हे शहा यांची भेट घेणार असल्याचं समजतं.
पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करून सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. पंतप्रधानांशी माझी भेट झाली. या भेटीत राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, असं पवार म्हणाले होते. महत्त्वाचं म्हणजे पवारांनी या ट्विटसोबत पंतप्रधानांना देण्यात आलेलं पत्रही पोस्ट केलं होतं. बँकिंग अधिनियमामधील दुरुस्तीबाबतचं हे पत्रं होतं.

Leave a Reply