पवारांना उद्धव ठाकरेंचं कौतुक कशासाठी?; भाजपचा सवाल

मुंबई : २ ऑगस्ट – मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केल्यानंतर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, कशासाठी कौतुक?, असा सवाल केला आहे.
केशव उपाध्ये यांनी ट्वीट करून निशाणा साधला आहे. या ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीतील पाच उदाहरणंही दिली आहेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं, पण कशासाठी कौतुक? कारण गेले दिड वर्ष भाषणातले शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन व त्यांचं ड्रायव्हिंग हेच तर जनता पहातेय. ते जे प्रकल्प सुरू करत आहेत ते सुरू केले देवेंद्र फडणवीस यांनी, असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
उलट मुख्यमंत्र्यांची कारकीर्द सांगायचीच तर कोरोनातील अपयश, मराठा आरक्षण टिकवण्यात अपयश, ओबीसी आरक्षण अपयश, पूरग्रस्तांना मदतीत अपयश, शेतकऱ्याना मदतीत अपयश ही अपयशाची यादी वाढू शकते”, असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply