संघ मुख्यालयाजवळ काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

नागपूर : १ ऑगस्ट – नागपुरमध्ये भाजपा व काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आले असून, त्यांच्यात वादावादी व धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरमधील संघ मुख्यालयाच्या परिसरात हे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मोर्चा रोखण्याचा भाजपा कार्यकर्त्यांकडून प्रयत्न झाल्याने, वादावादी व नंतर धक्काबुक्की झाली असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर, हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागल्याचेही दिसून आले.
काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई व अन्य केंद्र सरकारविरोधी मुद्द्यांवर एक रॅली काढली होती. संघ मुख्यालयाचा परिसर हा दाटीवाटीचा असून, सुरक्षेच्या कारणास्तव तिथे वाहतुकीवर अनेक निर्बंध आहेत. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथूनच रॅली नेण्याचा हट्ट धरला. त्यावर तेथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यास विरोध दर्शवला आणि त्यामुळे वाद निर्माण झाला व दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते भिडले असं सांगण्यात आलं आहे.
तर, परिस्थितीची गांभीर्य पाहून घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी वाद मिटवण्यासाठी हस्तक्षेप केला व पोलिसांची जादा कुमकही मागवली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून मागे जावं लागलं. असं देखील सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply