संपादकीय संवाद – निष्कलंक आणि चारित्र्यवान लोकप्रतिनिधी ही आजची गरज

डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. गणपतराव ११ वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर गेले दोन दिवस त्यांचा एसटी बसमधून उतरतानाचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होतो आहे. ही बाब खरी आहे की ११ वेळा आमदार राहूनही गणपतराव नेहमीच एसटी बस ने प्रवास करायचे, महाराष्ट्रात एसटी बसमध्ये एक आणि दोन क्रमांकाच्या सीट्स आमदारांसाठी राखीव ठेवण्याची पद्धत आहे, हा संदर्भ देत समाजमाध्यमांवर एक प्रतिक्रिया फिरते आहे ती अशी की, गणपतराव हेच एकटे ही सवलत वापरायचे, त्यांच्यानंतर ही सवलत कुणी वापरणार नाही त्यामुळे एसटी ने ही सवलत बंद करावी ही सूचना दिली जात होती.
समाजमाध्यमांवर फिरणारी ही सूचना निश्चितच वास्तवाचे दर्शन घडवणारी होती. गेल्या अनेक वर्षांपासून एसटी मध्ये आमदारांसाठी दोन जागा कायम आरक्षित ठेवण्याची पद्धत आहे. जागा रिकामी आहे म्हणून कुणाला बसवले आणि जर अचानक आमदार येऊन पोहोचले तर ती जागा रिक्त करून द्यावी अश्याही सूचना आहेत. सुरुवातीच्या काळात बरेच आमदार एसटीने प्रवास करायचे त्या काळात आंदरांजवळ स्वतःचे वाहनही नसायचे. नागपूर शहरातच अनेक आमदारांना स्कुटरवर शहरात फिरतांना आमच्या पिढीने बघितले आहे. नंतरच्या काळात आमदारांना चारचाकी गाडी घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज मिळू लागले. पेट्रोल, डिझेलचा भत्ता आणि ड्रायव्हरचा पगारही दिला जाऊ लागला. तेव्हापासून आमदारांचे एसटी वापरणे कमी झाले.
आज आमदारांना अश्या अनेक सवलती मिळतात. त्यांना मुंबईत स्थायी स्वरूपात आमदार निवासात खोल्या उपलब्ध असतात.. तेथील उपहारगृहात सवलतीच्या दरात खाद्यपदार्थही मिळतात. आमदारांनी स्वतःचे चारचाकी वाहन घेतले नसेल तर त्यांना मागणी केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून सरकारी वाहनही उपलब्ध करून दिले जाते. टेलिफोन सेवाही विनामूल्य उपलब्ध करून दिली जात असते. एका स्वीय सहाय्यकाचा पगार, स्टेशनरी अश्या सर्वच सुविधा दिल्या जात असतात. अर्थात या सर्व सेवा आमदारांनी जनतेची योग्य पद्धतीने सेवा करावी या अपेक्षेनेच दिल्या जात असतात. काहीवेळा या सवलतींचा दुरुपयोग होत असल्याचीही तक्रार पुढे येते. आमदार निवासाच्या खोलीत प्रसंगी आमदारांनी पोटभाडेकरू ठेवल्याचाही चर्चा आमदार निवासात रंगतात. आमदार निवासाच्या खोलीत राहून अनेकजण आपले मुंबईतले जोडधंदेही पार पाडत असल्याचेही बोलले जाते. हे सर्व शासकीय सवलतींचे दुरुपयोगाचं म्हणावे लागतील.
या सर्व पार्श्वभूमीवर गणपतरावांसारख्या निर्मोही नेत्याचे व्यक्तिमत्व केव्हाही उठूनच दिसते. नागपुरात विधिमंडळ अधिवेशन असले की सर्व आमदारांची उतरण्याची सोय आमदार निवासात केली असते मात्र, अनेक आमदार आणि मंत्री शहरातील महागड्या हॉटेलमध्ये खोल्या भाड्याने घेऊन राहतात. त्यांचे भाडे कोण भरते हा प्रश्न अलाहिदा. या सर्व आमदारांसाठी त्यांच्या खास गाड्या त्यांच्या गावातून नागपुरात येत असतात.
गणपतराव मात्र कायम आमदार निवासातच उतरायचे, अधिवेशन काळात आमदार निवास ते विधानभवन अशी आमदारांसाठी विनामूल्य बससेवा चालते मधली काही वर्षे त्या बसने येणारे आणि जाणारे गणपतरावच एकटे होते, म्हणूनच आता ही सेवा बंद करावी अशी सूचना समाजमाध्यमांवरून फिरत असावी.
लोकशाही व्यवस्थेत जर चारित्र्यसंपन्न राष्ट्र घडवायचे असेल तर लोकप्रतिनिधी निष्कलंक आणि चारित्र्यवान असणे ही आजची गरज आहे. गणपतरावांसारखे लोकप्रतिनिधी हे त्यामुळेच आदर्श ठरतात हे निश्चित.

अविनाश पाठक

Leave a Reply