नागपूर-उमरेड ३० मिनिटांत आणि ४० मिनिटांत ब्रहपुरी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर : १ ऑगस्ट – उत्तर व मध्य नागपूरला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत होऊन या मार्गावरील गर्दी कमी होईल. हा उड्डाणपूल अशक्यच होता. पण ‘महारेल’ने चांगले डिझाईन तयार केल्यामुळे तो होत आहे. तसेच नागपूर ते उमरेड ब्रॉड गेजचे काम सुरू झाले आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर उमरेडपर्यंत ३० मिनिटांत आणि ४० मिनिटात ब्रहपुरीपर्यंत पोहोचता येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सांस्कृतिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ऑनलाईन उपस्थित होते. तसेच महापौर दयाशंकर तिवारी, पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खा. कृपाल तुमाने, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक आर. के. जायसवाल उपस्थित होते.
केंद्र सरकार, ऊर्जा विभाग आणि पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने नागपूर- उमरेड ब्रॉडगेजचे काम होत आहे. उमरेड- भिवापूर हा रस्ता वनविभागातील अडचणीमुळे चार पदरी होऊ शकत नाही. राज्य शासनाकडून चार पदरीसाठी मंजुरी मिळाली तर आपण उमरेड -भिवापूरही चार पदरी करू, असेही गडकरी म्हणाले. या उड्डाणपुलासोबतच गोळीबार चौकापर्यंत मोठा रस्ता करणार आहे. या उड्डाणपुलामुळे मोमीनपुरातील वाहतूक कमी होईल. पूर्व, मध्य, दक्षिण व उत्तर नागपुरातील जनतेलाही चांगल्या दर्जाचे जीवन जगता यावे यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे.
या उड्डाणपुलाचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करायचे आहे. महारेलकडून संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याच्या हेतूने रेल्वे उड्डणपूल आणि भुयारी मार्गांची कामे ९० ठिकाणी सुरू आहेत. त्यापैकी ३० उड्डाणपूल विदर्भात आहेत असेही गडकरी म्हणाले. महारेलसोबत काम करण्याची संकल्पना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यापुढे मांडली होती. तेव्हा मी म्हणालो, हे रेल्वेचे अधिकारी काही बरोबर नसतात. पण, महारेलचे एम.डी जयस्वाल यांच्यासारखे काही चांगले अधिकारीही असतात, असेही गडकरी म्हणाले.

Leave a Reply