ममता बॅनर्जी आधी पश्चिम बंगालसाठी लढल्या, आता त्यांनी भारतासाठी लढावं : जावेद अख्तर

नवी दिल्ली : ३१ जुलै – गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची दिल्लीत भेट घेतली. ममतांनी कलाकारांना रॉयल्टी देण्याच्या विधेयकाचे समर्थन केल्याबद्दल जावेद अख्तर यांनी त्यांचे आभार मानले. पश्चिम बंगालने नेहमीच क्रांतिकारी चळवळींचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आधी पश्चिम बंगालसाठी लढल्या, आता त्यांना भारतासाठी लढावं, असं मत यावेळी जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं.
देशात सध्या अनेक तणाव आहेत. ध्रुवीकरणाचा मुद्दा तर आहेच, शिवाय बरेच लोक आक्षेपार्ह विधाने करत असतात, देशात हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हे सर्व रोखण्यासाठी देशात बदल होणं गरजेचं आहे, असं मत अख्तर यांनी मांडलं. ममता बॅनर्जी परिवर्तनावर विश्वास ठेवतात. पूर्वी त्या बंगालसाठी लढल्या आता त्यांना देशासाठी लढायचं आहे. भाजपाविरोधात विरोधी पक्षांचं नेतृत्व त्या करतील की नाही हे महत्वाचं नसून तुम्हाला कोणत्या प्रकारचा भारत हवा आहे, कोणत्या प्रकारचं वातावरण, परंपरा, स्वातंत्र्य आणि लोकशाही हवी आहे, हे महत्वाचं आहे, असं अख्तर म्हणाले.

Leave a Reply