बसवराज बोम्मई यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

बंगळुरू : २८ जुलै – गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर भाजपाच्या दिल्लीतील नेतेमंडळींकडून दबाव असल्याच्या अनेक चर्चा या काळात रंगल्या. मात्र, आपल्यावर कोणताही दबाव नसून स्वेच्छेने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं येडियुरप्पांनी स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर बसवराज बोम्मई यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधीदरम्यान माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा उपस्थित होते. या बरोबरच भाजपाचे इतर अनेक बडे केंद्रीय व राज्य ज्येष्ठ नेतेही या कार्यक्रमात उपस्थित होते. बोम्मई कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री असणार आहेत.
येडियुरप्पांप्रमाणेच बसवराज बोम्मई हे देखील लिंगायत समाजाचे नेते असून, ते येडियुरप्पांचेच निकटवर्तीय मानले जातात. ६१ वर्षीय बसवराज बोम्मई यांनी आत्तापर्यंत गृहविभाग, कायदे विभाग, सांस्कृतिक कार्यमंत्रिपद, अशा अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी बोम्मई यांनी भाजपाचे केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी आणि अर्जुन सिंह यांची बंगळुरूमध्ये भेट घेतली.

Leave a Reply