बालाजी पार्टीकल सहकारी कारखानाप्रकरणी खा. भावना गवळी यांना उच्च न्यायालयाची नोटीस

नागपूर : : २७ जुलै – बालाजी पार्टीकल सहकारी कारखान्याच्या विक्रीत कोटय़वधीचा गैरव्यवहार झाला असून, यवतमाळ- वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्यासह इतरांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची विनंती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आली. या याचिकेवर न्या. विनय देशपांडे आणि न्या. अमित बोरकर यांनी वाशीमचे पोलीस अधीक्षक व इतर प्रतिवादींना नोटीस बजावली असून प्रकरणाची सुनावणी दहा आठवडय़ाने ठेवली आहे. कारखान्याच्या अध्यक्ष, अवसायक, कारखान्याची जमीन खरेदी करणाऱ्या संस्थेची अध्यक्ष या सर्व पदावर खासदार गवळी होत्या. तसेच कारखाना खरेदी करणारी कंपनीही त्यांच्याच नावाची असून, मालकी त्यांच्या स्वीय सहाय्यकाची आहे. खा. गवळी यांनी कट रचून कारखाना विकल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
कापसाच्या कचऱ्यापासून खर्डा, प्लायवूड तयार करण्यासाठी सहकारी तत्त्वावर बालाजी पार्टीकल सहकारी कारखान्याची निर्मिती करण्यात आली. ११९२ ला राज्य सरकारने ४३.३५ कोटी रुपये दिले होते. दरम्यान कारखान्यासाठी मशीन्स खरेदी करण्यात आल्या. पण, कारखाना उभा होण्यापूर्वीच डबघाईला आला. कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष पुंडलिकराव गवळी यांनी कोणतीही निविदा प्रक्रिया न करता १४ हेक्टर ९० आर शेतजमीन कारखान्याची जमीन त्यांची मुलगी अध्यक्ष असलेल्या खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेला विकली. २००१ ला पुंडलिकराव गवळी यांच्या निधनानंतर भावना गवळी कारखान्याच्या अध्यक्ष झाल्या. त्यांनीही २००७ पर्यंत कारखाना उभा केला नाही. त्यानंतर कारखाना बुडाल्याचे जाहीर करण्यात आले व राज्य शासनाने अवसायक नेमले. कारखाना बुडवणाऱ्या अध्यक्षा भावना गवळी यांनाच अवसायक नेमण्यात आले. दरम्यान, अवसायकाकडून कारखाना विकण्यात येत असल्याचे समजातच २००८ मध्ये जिल्हा उपनिबंधकांनी कारखान्यात शासनाची गुंतवणूक असल्याने पूर्वपरवानगीशिवाय ते विकता येणार नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान पणन संचालकांनी कारखाना विकणे किंवा भाडेतत्त्वावर देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील तीन वृत्तपत्र आणि प्रादेशिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून निविदा मागण्याची अट घातली. दरम्यान त्यांनी २०१० पर्यंत जाहिरात प्रसिद्ध केली. शेवटची जाहिरात स्थानिक पातळीवरील छोटय़ा नियतकालिकात देण्यात आली. त्यावर भावना अँग्रो सर्विसेस लि. कंपनीची एकच निविदा प्राप्त झाली व या कंपनीला कारखाना ६ कोटी ८४ लाखा ९० हजारात विकण्यात आला. विशेष म्हणजे, कारखाना खरेदी करताना कंपनीत भावना गवळी यांचे स्वीय सहायक अशोक नारायण गांडुळे यांची ९० टक्के भागीदारी आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख हरीश सारडा यांनी याचिकेत केली आहे.

Leave a Reply