घटनेचे राजकारण करण्याची नाही तर नुकसानग्रस्तांचं पुनर्वसन करण्याची ही वेळ – देवेंद्र फडणवीस

महाड : २५ जुलै – तळीयेची दुर्घटना अत्यंत भीषण आणि दुर्देवी आहे. या घटनेचं राजकारण करण्याची किंवा कुणावरही टीका करण्याची ही वेळ नाही. सध्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढणं आणि नुकसानग्रस्तांचं पुनर्वसन करणं महत्त्वाचं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुर्घटनाग्रस्त तळीये गावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचं सांत्वन केलं. याप्रसंगी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित होते. ही घटना घडल्यानंतर प्रविण दरेकर सर्वात आधी या ठिकाणी पोहोचले. त्यांनी या ठिकाणी येऊन प्रशासन लवकर पोहोचेल असा प्रयत्न केला. या भागाची आम्ही पाहणी केली. अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. मात्र, एनडीआरएफ युद्धपातळीवर काम करत आहे. दोन किलोमीटर अंतरावर बॉडी गेल्या आहेत. या मृतदेहांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.
या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकार मदत करेल. पंतप्रधान आवास योजना आणि एनडीआरएफचं अनुदान घरे बांधण्यासाठी देण्यात येईल. नुकसानग्रस्तांना ज्या प्रकारची मदत हवी ती केंद्राकडून मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
राज्य सरकारने दुर्घटना घडल्यानंतर चांगलं काम केलं आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, इथे चांगलं किंवा वाईट काम केल्याचं प्रशस्तीपत्रं देण्यासाठी आलेलो नाही. प्रशस्तीपत्रं देण्याची ही वेळ नाही. मृतदेह बाहेर काढणं हे महत्त्वाचं आहे. प्रशासन चांगलं काम करत असेल तर त्यांच्या पाठी राहीलं पाहिजे. आज फोकस रिलीफवर असला पाहिजे. अशा प्रकारच्या घटना घडल्या तर काय केलं पाहिजे याचं आकलन करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

Leave a Reply