शिक्षकमित्राने दिलेल्या जबरी शिक्षेने चिमुकलीचे प्रकृती खालावली, संबंधितांवर गुन्हा दाखल

नागपूर : २५ जुलै – मागील दीड वर्षांपासून देशात कोरोना विषाणूचा प्रकोप सुरू आहे. याचा सर्वाधिक परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्यानं अनेक गरीब विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आली आहे. अशात ऑनलाइन शिक्षणाचा अवलंब करण्यात आला आला. पण ग्रामीण भागातील विविध अडचणींमुळे ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग देखील फसला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीनं गावातील शिक्षित तरुण-तरुणींची ‘शिक्षकमित्र’ म्हणून निवड करत अध्यापन सुरू केलं आहे.
पण लहान मुलांना कशा पद्धतीनं शैक्षणिक धडे द्यायचे याचा अनुभव नसल्यानं हे शिक्षकमित्रचं विद्यार्थ्यांसाठी अडचण ठरत आहेत. कारण एका शिक्षकमित्र तरुणीनं एका चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला जबरी शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे. हातावर छड्यांचा मार आणि २०० उठबशा काढायला लावल्यानं चिमुकलीची प्रकृती खालावली आहे. ‘शिक्षणमित्र’ तरुणीच्या प्रतापामुळे गावात संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित घटना नागपूर जिल्ह्यातील महालगाव येथील आहे.
याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि शिक्षकमित्र तरुणी अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापक पांडुरंग बुचे, वर्गशिक्षक राजेश चौधरी आणि शिक्षकमित्र आंचल मंगेश कोकाटे (वय-२१) असं गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून घटनेचा तपास सुरू केला आहे. पीडित मुलीला अशी अमानुष शिक्षा दिल्यानं तिला शारीरिक त्रासासह मानसिक धक्का बसल्याची माहिती पीडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
वृत्तानुसार, ९ जुलै रोजी पीडित विद्यार्थिनी आंचल कोकाटे यांच्या घरी शिक्षणासाठी गेली होती. दरम्यान वर्गात यायला उशीर झाल्यानं आंचल यांनी पीडित मुलीला छड्यांचा मार दिला. तसेच २०० उठबशा काढण्याची शिक्षा दिली. ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सहमतीनं स्वतंत्र ठराव मंजूर करत संबंधित शिक्षकमित्र तरुणीसह गावातील अन्य सहा जणांची निवड करण्यात आली होती. कोरोना नियमांचं पालन करत शिक्षकमित्राच्या घरी सेतू वर्ग सुरू करण्यात आले होते. पण शिक्षकमित्र तरुणीनं विद्यार्थिनीला दिलेल्या शिक्षेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Leave a Reply