भयावह परिस्थिती, आता सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरले पाहिजे – चंद्रकांत पाटील

अहमदनगर : २३ जुलै – राज्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो. आताही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील वॉर रूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलून आढावा घ्यावा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलताना हे आवाहन केलं आहे. 2019 साली जेव्हा महापूर आला तेव्हा 15 दिवस पाणी ओसरत नव्हतं. मी आणि देवेंद्र फडणवीस डायरेक्ट फिल्डमध्ये होतो. हेलिकॉप्टर, बोटीच्या माध्यमातून आम्ही पोहचलो होतो. अनेक वेळा पाण्यात बसून निर्णय करायचो. त्यावेळी आमच्यावर काँग्रेसकडून टीका केली जात होती. आता तुम्ही सत्तेत आहात. तात्काळ निर्णय घ्या, लोकांना मदत करा, असं पाटील म्हणाले.
अनेक इमारती पाण्यात गेल्या आहेत. मात्र आमचे मुख्यमंत्री मातोश्रीत बसले आहेत. ते वर्षा निवासस्थानीही नाहीत. मंत्रालयातही नाहीत. मी सकाळी 7 वाजताच मंत्रालयात जाऊन कामाला लागायचो. हा राजकारणाचा विषय नाही. पण उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात येऊन वॉररूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलले पाहिजे. त्यांच्याकडून आढावा घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजेत. आम्ही सरकारला कधीही मदत करायला तयार आहोत. पण त्यांना कोणाची मदत नको असते. कोणाशीही बोलायला आम्ही तयार आहोत. सढळ हाताने मदत करायला तयार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
कोविड संकटात सर्व मदत केंद्र सरकारच देत आलं आहे. तुमच्या तिजोरीची किल्ली हरवली आहे. भ्रष्टाचार करायला ही किल्ली रात्रीच सापडते, अशी टीकाही त्यांनी केली. काल स्वतःहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली. तसेच आवश्यक मदत करण्याचं आश्वासन दिलं, असं ते म्हणाले.
गेल्या अठरा महिन्यात सरकार कशाच्याही बाबतीत गंभीर होत नाही. केंद्राकडे मदत पाठवण्याआधी आपली तिजोरी खोलून वाटून टाकायची असते. मागच्या दुष्काळात आम्ही 6 हजार 700 कोटींच पॅकेज दिलं होतं. पण हे सरकार राज्याचं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवलं जातं. परंतु यांना कुठलीही तत्परता नसून कोणतंही व्हिजन नाही. फक्त ढकलाढकली सुरू आहे. या संकटात कोल्हापूरचे पालकमंत्री कुठे आहेत?, असा सवालही त्यांनी केला.

Leave a Reply