भारत-चीनच्या सैन्यात पुन्हा चकमक

नवी दिल्ली: २२ जुलै-चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा पूर्व लडाखमधील अनेक ठिकाणी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन्ही देशांच्या सैन्यात एक चकमक झाल्याचेही सांगण्यात आले. या वेळच्या चकमकीत काही प्राणहानी झाली की नाही हे समजू शकले नाही. गेल्यावर्षी १५ जूनला गलवान नदीच्या खोऱ्यात झालेल्या चकमकीत वीस भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते.
चीनने एप्रिल २०२१ च्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा घुसखोरी सुरू केली. त्या वेळी काही चिनी ड्रोन विमाने भारतीय हद्दीत आली होती व त्यांनी या भागाची टेहळणी केली असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. मे व जून महिन्यात डेमचोक व चुमार या दक्षिण लडाखमधील भागात गस्त सुरू असताना तेथे नागरी वेशातील चिनी सैन्याचे अस्तित्व आढळून आले. मे महिन्याच्या मध्यावधीत भारतीय सैन्याने चिथावणी दिली नसतानाही चिनी सैन्याने अनेक ठिकाणी संघर्षाचा पवित्रा घेतला, त्यामुळे तणाव निर्माण होऊन भारतीय सैन्य पुन्हा तैनात करण्यात आले.
दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आल्याने आता तेथे पुन्हा एकदा संघर्षाची चिन्हे आहेत. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीपल्स लिबरेशन आर्मीने त्या भागात हवाई क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केल्या आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हालचाली पँगॉग सरोवराच्या उत्तर किनारा परिसरात वाढल्या असून विशेष करून सिरीजाप येथे त्यांनी तोफगोळे व इतर साधनसामग्री आणली आहे.

Leave a Reply